गुवाहाटीत आमदारांची चंगळ; हिंगोलीत माजी आमदाराची परवड

गलांडे यांना २४ जून रोजी ‘गॅलक्सी’मध्ये  दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्यावर डॉ. जोशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी  शस्त्रक्रिया केली. 

गलांडे हे १९७८ ते ८० या कालावधीत आमदार होते. सध्या ८८ वर्षांचे आहेत

संजीव कुळकर्णी, लोकसत्ता 

नांदेड : राज्य विधान परिषदेच्या निवडणुकीपासून ते शिवसेना आणि इतर आमदारांच्या बंडापर्यंतच्या राज्यातील राजकारणात घोडेबाजार आणि आर्थिक व्यवहारांची थक्क करणारी चर्चा सर्वत्र सुरू असताना, हिंगोलीतील जनसंघाचे जुने कार्यकर्ते, माजी आमदार दगडू गलांडे यांच्या एका असाध्य आजारावरील उपचारखर्चाचे ५० हजार रुपये जमा करण्यासाठी त्यांच्या नातेवाइकांना मोठी कसरत करावी लागल्याचे समोर आले आहे.

असंख्य चांगल्या परंपरांचे दाखले देणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेतील मोठय़ा बंडातील अर्थकारण तसेच बंडातील आमदारांच्या व्यवस्थेवर चाललेला कोटय़वधींचा खर्च यांची वेगवेगळय़ा माध्यमांत गंभीरपणे चर्चा सुरू असताना, भूदान चळवळ आणि आणीबाणीत स्वत:ला झोकून देणाऱ्या गलांडे यांच्यावरील शस्त्रक्रियेसाठी प्रयत्नांती ५० हजारांची जुळवाजुळव झाली खरी, शासनाची कोणतीही योजना त्यांच्या मदतीसाठी उपलब्ध झाली नाही.

गलांडे हे १९७८ ते ८० या कालावधीत आमदार होते. सध्या ८८ वर्षांचे आहेत. त्यांना अन्ननलिकेतील एक दुर्मीळ आजार झाल्यामुळे मे महिन्याच्या अखेरीस नांदेडच्या गॅलक्सी रुग्णालयात आणण्यात आले. तपासणी आणि काही चाचण्यांतून त्यांच्या आजाराचे नेमके निदान झाले; पण त्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी किमान ५० हजार रुपये खर्च येणार होता. साधेसरळ जीवन जगलेल्या या माजी आमदाराकडे त्या वेळी तेवढी रक्कम नव्हती म्हणून नातेवाईक त्यांना परत हिंगोलीला घेऊन गेले.

या सर्व घडामोडींमध्ये सरकारच्या योजनेतून अर्थसाहाय्य मिळविणे हा पर्याय समोर होता; पण अशी मदत मिळवताना दलाली द्यावी लागते त्यामुळे गांधीवादी असलेल्या गलांडेंनी हा पर्याय ठोकरला डॉक्टरांकडून गोळय़ा-औषधे घेऊन त्यांनी रुग्णालयातून सुटी घेतली. सुटी घेतल्यानंतर पुन्हा तीन आठवडय़ांनंतर ते उपचारासाठी नांदेडला आले असता त्याच दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला. शिंदे गटाच्या आमदारांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी खास विमाने, मुक्कामासाठी पंचतारांकित हॉटेलच्या खोल्या आणि तेथील सुसज्ज व्यवस्था यावर कोटय़वधींचा चुराडा होत असताना इकडे जनसंघाच्या संस्कारातील माजी आमदाराची परवड सुरू होती.

गॅलक्सी रुग्णालयाचे प्रमुख डॉ. नितीन जोशी यांना गलांडे यांची राजकीय-सामाजिक पार्श्वभूमी एक-दोन भेटींमध्ये कळाली. राज्याच्या राजकारणात सध्या चाललेला घोडेबाजार दुसऱ्या बाजूने समोर दिसत होता. अशा परस्परविरोधी वातावरणात गलांडे यांना २४ जून रोजी ‘गॅलक्सी’मध्ये  दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्यावर डॉ. जोशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी  शस्त्रक्रिया केली. 

२५ जून रोजी गलांडे यांना जेवण व्यवस्थित जात आहे. आधी होणारा त्रास थांबला आहे, असे जोशी यांनी रविवारी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Relatives work hard to collect money for treatment of former mla dagdu galande zws

Next Story
“मरण जरी आलं तरी बेहत्तर…” एकनाथ शिंदेंच्या नव्या ट्वीटची चर्चा, बाळासाहेबांचा उल्लेख करत विचारला गंभीर प्रश्न, म्हणाले…
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी