वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रांच्या स्वच्छतेसाठी ‘झाडू संताचे मार्ग’ या अभियानाचा प्रारंभ ‘रामकृष्ण हरि’ या मंत्राच्या जपाने करण्यात आला. त्याची सुरुवात भूलोकीचे वैकुंठ श्रीक्षेत्र पंढरपूर येथे श्री विठ्ठल मंदिर परिसरात बुधवारी करण्यात आली.
या अभियानाचा प्रारंभ हभप रामदास महाराज जाधव (कैकाडी महाराज) यांच्या हस्ते व राज्य परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक, जिल्हा परिषद अध्यक्ष जयमालाताई गायकवाड, बद्रिनाथ तनपुरे, समस्त वारकरी, फडकरी िदडी समाज संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेशर जळगावकर, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळय़ाचे अध्यक्ष भानुदास ढवळीकर, बापूसाहेब देहूकर, तुकाराम काळे (आजरेकर), माधव शिवणीकर, केशव नामदास, भाऊसाहेब पाटील, धोंडोपंत शिरवळकर, सोपानकाका टेंभूकर यांच्या उपस्थितीत झाडू मारून करण्यात आला. ही मोहीम राज्यातील सर्व तीर्थक्षेत्रांवर अव्याहतपणे चालू ठेवण्याची ग्वाही परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी दिली.
नेहमीच ‘रामकृष्ण हरि’ मुखीमंत्राचा जयघोष करणाऱ्या महाराज, फडकरी मंडळी यांनी हातात झाडू घेऊन विठ्ठल मंदिर परिसरात स्वच्छतेस सुरुवात केली. आज कीर्तनकार, प्रवचनकारांच्या हातात मंत्राबरोबर झाडू पाहिला. मने स्वच्छ करणाऱ्या संतांनी स्वच्छतेचा मंत्र रुजविण्यासाठी वारकरी साहित्य परिषदेच्या ‘झाडू संताचे मार्ग’ या अभियानाला उत्तम प्रतिसाद मिळाला.
या वेळी बाबा महाराज रािशगकर, संजय देहूकर, जगन्नाथ देशमुख, भानुदास यादव, श्याम उखळीकर, श्रीकांत ठाकूर, ज्ञानेशर जोगदंड, विठ्ठल चवरे, निवृत्ती नामदास, अर्जुन पांचाळ, सोपान तलवडेकर, रमाकांत बोंगाळे हे वारकरी संप्रदायातील सर्व प्रमुख महाराज उपस्थित होते. समाजसेविका रत्नप्रभा पाटील यांच्यासह नागरिक, भाविक या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
या वेळी विठ्ठल पाटील म्हणाले, की जगद्गुरू तुकोबाराय यांच्या ‘झाडू संताचे मार्ग’ या उक्तीप्रमाणे व श्री संत गाडगेबाबा यांच्या कृतीप्रमाणे वारकरी साहित्य परिषदेने व महाराज मंडळींनी हा उपक्रम हाती घेतला आहे. महाराष्ट्रातील सर्व तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी हे अभियान राबविले जाणार आहे. राज्यातील विविध तीर्थक्षेत्रांवर भाविक लाखोंच्या संख्येत येत असतात, भक्तिभावाने श्रद्धेने ते नतमस्तक होतात. श्रद्धेने १०८ मण्यांची माळ हाती घेऊन जप करतात. त्याचप्रमाणे तीर्थक्षेत्रे पवित्र, स्वच्छ आणि प्रसन्न राहावीत यासाठी प्रत्येक भाविकाने १०८ वेळा ‘रामकृष्ण हरि’ या मंत्राचा जप करत परिसरात झाडू मारला तर निश्चितपणे ही तीर्थक्षेत्रे स्वच्छ राहतील. या अभियानांतर्गत सुरुवातीला महाराष्ट्रातील ११ तीर्थक्षेत्रांच्या स्वच्छतेची मोहीम राबविणार आहोत. यामध्ये श्रीक्षेत्र पंढरपूर, श्रीक्षेत्र देहू, श्रीक्षेत्र आळंदी, श्रीक्षेत्र पठण, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर, श्रीक्षेत्र तुळजापूर, श्रीक्षेत्र जेजुरी, श्रीक्षेत्र शिर्डी, श्रीक्षेत्र शेगाव, अक्कलकोट, श्रीक्षेत्र नृसिंहवाडी या तीर्थक्षेत्रांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. हळूहळू राज्यातील सर्वच तीर्थक्षेत्रांवर हे अभियान राबविले जाणार आहे. पंढरपुरातील रस्ता दुभाजकाच्या मध्ये असणाऱ्या जागेत तुळशीची रोपे लावून हा परिसर सुशोभित करून व प्रदूषणमुक्त करण्यासाठी शहरातील सर्व भागांतील दुभाजकामध्ये तुळशी रोपे लावली जातील, असे विठ्ठल पाटील यांनी सांगितले.
पंढरपूर नगरपरिषदेने झाडू संतांचे मार्ग, करू पंढरीचा स्वर्ग हे ब्रीदवाक्य घेऊन स्वच्छतेचा वसा घेऊन स्वच्छतेचा मंत्र जपणाऱ्या आरोग्य खात्याने तसेच मान्यवर मंडळींनी मात्र या अभियानाकडे पाठ फिरवली. याबाबत वारकरी परिषदेने खासगीत खंत व्यक्त केली.
श्रद्धेचे रूपांतर सेवेत
महाराष्ट्रातील सर्व तीर्थक्षेत्रांवर लाखोंच्या संख्येने वारकरी येत असतात. त्यांची परमेश्वरावर श्रद्धा असते. ते मोठय़ा श्रद्धेने परमेश्वरचरणी लीन होतात. त्यांच्या मनात तीर्थक्षेत्रांच्या स्वच्छतेबाबतही जागरूकता निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. असे झाले तर येणारे भाविक कुठेही स्वत: कचरा करणार नाहीत तसेच ते स्वच्छता करतील. त्यामुळे तीर्थक्षेत्रे नेहमीच स्वच्छ राहतील. श्रद्धेचे रूपांतर सेवेत करा! हेच वारकरी साहित्य परिषदेचे उद्दिष्ट आहे.
असे असेल अभियान
पंढरपुरातील विठ्ठल मंदिरापासून अभियानाची सुरुवात झाली. परिसरात सुमारे १०० मीटरच्या अंतराने एका स्टँडवर दोन बादल्या व झाडू अडकवले आहेत. भाविकांनी ‘रामकृष्ण हरि’ हा मंत्र १०८ वेळा म्हणत परिसराची स्वच्छता करायची. कचरा बादलीत टाकायचा. हा कचरा उचलण्यासाठी ट्रॅक्टर ट्रॉली सातत्याने फिरत राहील. हा कचरा योग्य ठिकाणी विल्हेवाट लावण्यासाठी नेला जाईल. महाराष्ट्रातील सर्व तीर्थक्षेत्रांवर टप्प्याने हे अभियान राबविले जाईल. पंढरपुरातील भाविकांनी आज पहिल्या दिवसापासूनच स्वच्छतेला सुरुवात केली आहे.