|| विजय राऊत

 

जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड मार्गावरील खड्डय़ांमुळे वाहनचालक, प्रवासी त्रस्त

कासा : राज्यात युतीचे सरकार जाऊन आता महाविकास आघाडीचे सरकार आले आहे.  मात्र राज्याची राजधानी  मुंबईपासून  अवघ्या दीडशे किलोमीटर अंतरावर असलेल्या जव्हार या आदिवासी तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था आजही जशीच्या तशी कायम आहे. त्यामुळे आदिवासी भागातील रस्त्यांच्या विकासासाठी येणारा निधी जातो तरी कुठे? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.

जव्हार भागातील गाव-पाडय़ांना जोडणाऱ्या रस्त्यांसाठी कोटय़वधी रुपयांचा निधी मिळूनही रस्त्यांची दुर्दशा आजही कायम आहे.  कुठल्याही सरकारकडून ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे होत नसल्याचा आरोप ग्रामीण भागातील नागरिकांकडून केला जात आहे.       जव्हार तालुक्यात १ लाख ६० हजार लोकसंख्या असून, १०९ महसूल गावे आणि २४५ पाडे आहेत.

मात्र या जव्हार तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्यांची कामे व्यवस्थितरीत्या होत नसल्याने ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था कायम आहे. शासनाकडून ग्रामीण भागासाठी दरवर्षी करोडो रुपये मिळणारा निधी, आदिवासी विकास, ठक्कर बाप्पा, सार्वजनिक बांधकाम विभागातील बजेटची कामे होत आहेत. तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती बांधकाम विभाग या विभागांकडून ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी दरवर्षी लाखो रुपये येत आहेत. मात्र तालुक्यातील गावांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यांची परिस्थिती आजही जैसे थेच आहे. त्यामुळे कुठलेही सरकार असो, परंतु ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था कायम आहे. त्यामुळे आदिवासींना दिलासा मिळणार तरी कधी? असा सवाल नागरिक करीत आहेत.

जव्हार ते मोखाडा, नाशिक रस्ता, जव्हार ते वाडा आणि विक्रमगड रस्ता हे तालुक्यातून जाणारे महत्त्वाचे रस्ते आहेत. तसेच ग्रामीण आदिवासी भागातील देहेरे-मेढा रस्ता, तसेच केळीचा पाडा, साकूर, झाप-रस्ता, तसेच जामसर-विनवळ रस्ता, हे ग्रामीण भागातील महत्त्वाच्या खेडय़ापाडय़ांना जोडणारे रस्ते आहेत. मात्र  या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे.

तालुक्यातील काही डांबरीकरण, मजबुतीकरण, रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची कामे देखील झाली आहेत. परंतु वर्षभरातच डांबरीकरण करण्यात आलेले रस्ते आणि बुजविण्यात आलेले खड्डे वर्षभरातच उखडून निघाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.  रस्त्यांतील खड्डय़ाुंळे वाहनचालक आणि नागरिक त्रस्त झाले आहेत.   जव्हार तालुक्यात साकूर, नांदगाव, साखरशेत, जामसर असे चार प्राथमिक आरोग्य केंद्रावर रुग्णांचा भार अधिक आहे, यामध्ये गरोदर मातांना जव्हार ग्रामीण रुग्णालयात नेत असताना या रस्त्यातील खड्डय़ांचा त्रास सहन करावा लागत आहे.  अनेक गरोदर मातांना कुटीर रुग्णालयात नेताना प्रसूती झाल्याचे प्रकार घडले आहेत. दुचाकीचालकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे.   बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना या बाबत विचारले असता त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील रस्त्यांची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. अपघातांचे प्रमाण वाढत असून रस्त्याची सुरू असलेली कामेही निकृष्ट दर्जाची आहेत. -गोविंद भोये, नागरिक