पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी शहर विकास आघाडीच्या साधना नागेश भोसले यांची निवड झाली आहे. नगरपालिकेत आमदार भालके, खासदार धनंजय महाडिक, कल्याण काळे यांच्या सत्तेला त्यांच्याच ३ नगरसेवकांनी झटका दिल्याने कदम यांचा पराभव होऊन पुन्हा नगरपालिकेत परिचारक गटाची सत्ता आली.
पंढरपूर नगरपरिषदेच्या डिसेंबर २०११ रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत २५ वर्षांची परिचारकांची सत्ता पालट होऊन आ. भालके, महाडिक, काळे यांच्या गटाच्या ताब्यात आल्यानंतर पंढरपूर नगर परिषदेचे नगराध्यक्षपद अनुसूचित जाती जमाती महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने आ. भालके गटाच्या उज्ज्वला भालेराव या नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या होत्या. त्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाल संपल्याने नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन निवडणूक लागली होती. पुढील अडीच वर्षे खुल्या प्रवर्गातील महिला राखीव असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्य़ासह तालुक्याचे लक्ष लागले होते. पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी तीर्थक्षेत्र विकास आघाडी आ. भालेक गटाकडून लक्ष्मीबाई कदम, तर शहर विकास आघाडी परिचारक गटाकडून साधना भोसले यांनी अर्ज दाखल केले होते. नगराध्यक्षपदासाठी आज सोमवारी निवडणूक होऊन नगरपरिषदेत सत्तांतर होऊन आमदार भालके गटाकडून पुन्हा नगरपालिका परिचारक गटाकडे आली.