परभणी जिल्ह्यातल्या गोदाकाठच्या सर्वच तालुक्यांमध्ये सध्या बेफाम वाळूचा उपसा सुरू असून त्याकडे महसूल यंत्रणेने पूर्णपणे पाठ फिरवली आहे. जिल्ह्यात ‘कर्तव्यदक्ष’ प्रशासन असल्याचा उल्लेख वारंवार होतो, पण सध्या चालू असलेला बेकायदेशीर वाळू उपसा पाहू जाता प्रशासकीय यंत्रणा मूग गिळून गप्प का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातच वाळूमाफियांनी चक्क महसूल कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यापर्यंत मजल गाठल्याने आता त्यांचे मनोधर्यही उंचावले आहे.
तीन दिवसांपूर्वी वाळू वाहनांवर कारवाई केल्यामुळे दोन तलाठय़ांना महातपुरी फाटय़ावर बेदम मारहाण करण्यात आली. वाळूमाफियांच्या मुसक्या आवळण्याच्या घोषणाही कागदी डरकाळ्या ठरू लागल्या आहेत. क्षमतेपेक्षा जास्त वाळू वाहनांमधून नेली जात आहे. काळवेळेचेही बंधन पाळले जात नाही, अगदी सूर्यास्तानंतरही वाळूचा उपसा सुरूच आहे. जिथे वाळूचे धक्के लिलावात गेलेले आहे तिथे जणू संपूर्ण नदीच्या पात्रावरच आपली अनियंत्रित मालकी असल्याच्या थाटात वाळूमाफिया नदीचे पात्र खरवडून काढत आहेत. सुरुवातीला वाळू धंद्यातल्या अवैध प्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली होती. किमान तशा सूचना व निर्देश देण्यात आले होते. पात्रातून वाळूचा ट्रक अधिकृत रॉयल्टी भरून पात्राच्या बाहेर पडला की ट्रक चालकाच्या मोबाईल व पावती क्रमांकाचा एसएमएस ठेकेदारांकडून करणे बंधनकारक आहे. एवढे सगळे असतानाही वाळूची चोरी खुलेआम चाललेली आहे. जिल्हाधिकारी एस. पी. सिंह यांचा महसूल खात्यावर धाक आहे असे म्हणावे तर बहुतांश तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या संगनमतानेच व महसूल यंत्रणेच्या डोळ्यात धुळफेक करत हा वाळूउपसा सुरू आहे. महसूल यंत्रणेची भीती संबंधितांना राहिली नाही. म्हणूनच थेट तलाठय़ांना मारहाण करण्यापर्यंत वाळुमाफियांचे धाडस वाढले आहे. दहा टायरच्या वाहनातून वाळू वाहतुकीला परवानगी नाही. हा नियम केवळ कागदापुरताच मर्यादित राहिला आहे. हमरस्त्याने अशी मोठय़ा क्षमतेची वाहने वाळू भरून नेताना दिसून येतात. रात्री उशिरापर्यंत गंगाखेड तालुक्यातून वाहनांच्या रांगाच्या रांगा अन्य जिल्ह्यात वाळू घेऊन जाताना दिसत आहेत. परभणी जिल्ह्यातून बीड, लातूर या जिल्ह्यांमध्ये ही वाळू जात आहे. दिवसाच्या अनधिकृत उपशावर महसूल प्रशासनाने तर रात्रीच्या वाळू उपशावर पोलिसांनी र्निबध घालणे अपेक्षित आहे. तेथे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.
गंगाखेड, सोनपेठ, पालम या तालुक्यांमधून तर वाळूचा बेफाम उपसा सुरू आहेच, पण सेलू तालुक्यातही दुधना नदीच्या पात्रातून वाळूची तस्करी राजरोसपणे सुरू आहे. सेलू तालुक्यातल्या काजळी रोहिणा, मोरेगाव, राजवाडी या ठिकाणाहून हा अवैध वाळूउपसा सुरू आहे. पाथरी तालुक्यात रामपुरीच्या घाटातून हा अवैध उपसा सुरू आहे. तालुक्यात गोदावरीच्या पात्रात तब्बल २४ वाळू धक्के आहेत.