आज माजी मंत्री संजय देशमुख यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला आहे. शिंदे गटातील आमदार संजय राठोड यांच्यासाठी हे मोठे आव्हान असल्याचे बोलले जात आहे. संजय देशमुख हे राठोड यांचे राजकीय विरोधक असल्याने ठाकरे गटाकडून देशमुखांना बळ दिले जात असल्याची चर्चाही रंगू लागली आहेत. दरम्यान, संजय देशमुखांच्या या ठाकरे गटातील प्रवेशानंतर संजय राठोड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा – माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनी शिवबंधन बांधल्याने मंत्री संजय राठोड मतदारसंघातच अडचणीत
काय म्हणाले संजय राठोड?
“बाळासाहेबांच्या विचारांशी प्रेरित होऊन मी गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेत काम करतो आहे. यापुढेही माझं काम याच पद्धतीने चालणार आहे. कोण कुठं जातो, त्याने मला फरक पडत नाही. मी माझं काम प्रमाणिकपणे करत राहील”, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे आमदार संजय राठोड यांनी दिली आहे.
हेही वाचा – संजय देशमुख यांनी हाती शिवबंधन बांधताच उद्धव ठाकरेंची महत्त्वाची घोषणा; म्हणाले “तारीख ठरवा, मी…”
दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाबाबतही प्रतिक्रिया दिली, ”खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळावी, यासाठी राज्य सरकारने तातडीने पाऊल उचलत निधीची घोषणा करून जिल्ह्याला निधी वितरित केला. मात्र तलाठी, ग्रामसेवक यांच्या संपामुळे निधी वेळेत जमा झाला नाही. आता त्यांनी सामंजस्यपूर्ण भूमिका घेतली. त्यामुळे दिवाळीच्या पूर्वी सर्व निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल”, असे ते म्हणाले.