सारंगी महाजन यांचा गंभीर आरोप

प्रवीण महाजन यांचा मृत्यू नैसर्गिक नाही. सलग दोन वर्षे त्यांना मधुमेह आणि रक्तदाबाच्या गोळय़ा हेतूत: मिळू दिल्या गेल्या नाहीत. त्यामुळेच त्यांची प्रकृती खालावली. मानवाधिकार आयोगाकडे आपण वैद्यकीय अहवालासह मृत्यू नैसर्गिक नसल्याचे प्रकरण दाखल केले होते. त्यांनी आपल्या बाजूने निकाल दिला असून, वैद्यकीय मोबदल्यापोटी आपणास मंजूर करण्यात आलेली सात लाख रुपयांची रक्कमही अद्याप राज्य सरकारने दिली नसल्याचा गौप्यस्फोट सारंगी प्रवीण महाजन यांनी केला.

उस्मानाबाद येथे न्यायालयीन कामकाजासाठी आल्या असता त्यांनी ‘लोकसत्ता’शी संवाद साधला. प्रमोद महाजन घरातील माणसांनी सांगितलेले न ऐकता बाहेरील लोकांवर विश्वास ठेवायचे. त्यामुळेच ही वेळ येऊन ठेपली. आपले पती प्रवीण महाजन यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या रक्ताच्या तपासणी अहवालात सुरू असलेल्या गोळय़ांचे अंश आढळून आले नाहीत. डॉक्टरांनी हे निदर्शनास आणून दिले. सलग दोन वर्षे गोळय़ा बंद असल्यामुळे त्यांची प्रकृती खालावल्याचा निष्कर्ष वैद्यकीय अहवालातून समोर आला. त्यांच्या गोळय़ा ज्यांनी बंद केल्या तेच आज हयात नाहीत, त्यामुळे कोणावर आरोप करायचा, असा सवाल उपस्थित करीत त्यांनी या सगळय़ा प्रकरणावर आपण स्वतंत्र पुस्तक लिहिणार असल्याचे सांगितले. मानवाधिकार आयोगाने दिलेल्या निकालानुसार प्रवीण महाजन यांच्या वैद्यकीय खर्चापोटी मंजूर करण्यात आलेले सात लाख रुपये आपल्याला अद्याप मिळालेले नाहीत. भाजपच्या सरकारकडून ते मिळतील, अशी अपेक्षाही नाही. भाजपचे लोक किती मदत करतात, हे आपणास पक्के माहीत आहे, असेही त्यांनी सांगितले. आपल्या मुलांना त्यांचा हक्क हवा आहे. त्यासाठी आपण हा लढा देत आहोत.

वाटा द्यायला तयार : प्रकाश महाजन

सारंगी महाजन यांना वडिलोपार्जति जमिनीतील वाटा द्यायला आम्ही कधीच नकार दिलेला नाही. मात्र वाटणीत मोक्याची जागा हवी, असा अट्टाहास धरल्यामुळे प्रकरण न्यायालयात रेंगाळत आहे. काही बाबी आम्ही बोलू शकत नाही, याचा त्या गरफायदा घेत आहेत. त्यांना धमक्यांचे फोन येत असतील तर तसे पोलिसात का कळविले नाही? प्रवीण महाजन यांनी कारागृहात असताना स्वत:च गोळय़ा घेणे बंद केले होते, मात्र धादांत खोटे बोलून सारंगी महाजन कुटुंबीयांवर बेछूट आरोप करीत असल्याची प्रतिक्रिया प्रकाश महाजन यांनी दिली.