अलिबाग : मराठी साहित्यामध्ये मोलाचे योगदान एवढाच साने गुरुजींच्या कामाचा व्याप मर्यादित नाही. त्यांनी दिलेला मानवतेचा मंत्र आणि आंतरभारतीची संकल्पना याचा प्रसार करण्याचे काम साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टतर्फे केले जाते. त्याचाच महत्त्वाचा भाग म्हणून रायगड जिल्ह्यातील वडघर येथील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक येथे युवकांना घडविण्याचे काम सुरू आहे. तसेच, स्मारकातर्फे मराठी भाषेतील साहित्य बिगरमराठी भाषकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याचा इतर भाषांमध्ये अनुवाद करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. २५ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या या स्मारकाच्या तिसऱ्या टप्प्यातील विस्ताराचे काम हाती घेतले जाणार आहे. यासाठी आर्थिक पाठबळाची गरज आहे.

स्मारकात दरवर्षी विविध प्रकारच्या निवासी शिबिरांचे आयोजन केले जात असते. त्यामध्ये राज्यातील विविध भागांतून येणारे हजारो विद्यार्थी आणि युवक सहभागी  होतात. शिबिरांच्या माध्यमातून या युवकांमध्ये स्वभान ते सामाजभान निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. साने गुरुजींचे विचार मुलांवर बिंबवले जातात आणि या युवकांना नव्या भारतासाठी घडवले जाते. दरवर्षी स्मारकाच्या विविध शिबिरांमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दहा हजार इतकी आहे. नाममात्र शुल्क आकारून शिबिरार्थींची निवास व भोजन व्यवस्था केली जात असते.

हेही वाचा >>> सर्वकार्येषु सर्वदा : वसा साने गुरुजींच्या विचारांच्या प्रसाराचा,राष्ट्र घडविण्याचा

याशिवाय या स्मारकातर्फे आंतरभारती अनुवाद केंद्र चालवले जाते. त्याच्या माध्यमातून १९८०नंतरच्या मराठी लेखकांच्या साहित्याचा इंग्रजी व हिदी भाषेत अनुवाद करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मराठी लेखकांचे साहित्य जगभरातील वाचकांसाठी उपलब्ध व्हावे हा यामागील हेतू आहे. यासाठी अनुवादकांना निवासी फेलोशिप देण्याचा मानस आहे. मात्र पुरेसा निधी नसल्याने या उपक्रमाला मर्यादा येत आहे. यासाठी संस्थेला समाजाकडून आर्थिक पाठबळाची आवश्यकता आहे. स्मारकाच्या कामाचा पसारा वाढत असल्याने एक सुसज्ज ऑडियो व्हिडिओ संकुल उभारण्याचा निर्णय संस्थाचालकांनी घेतला आहे. या सर्व विविध उपक्रमांसाठी संस्थेला निधीची आवश्यकता आहे.

साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाला भविष्यात साहित्य, कला, सामाजिक, सांस्कृतिक केंद्र करण्याचा संस्थाचालकांचा मानस आहे. मात्र संस्थेकडे जमा होणारा निधी आणि संस्थेतर्फे चालणारे काम याचा ताळमेळ बसवणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. त्यासाठी समाजातील उदार हातांच्या मदतीची संस्थेला गरज आहे. या उपक्रमातून जो निधी जमा होईल त्याचा विनियोग योग्य प्रकारे केला जाईल. – प्रमोद निगुडकर, अध्यक्ष, साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट