जिल्ह्यातील ७ नगरपालिकांच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, येत्या ११ जुलस ही निवड केली जाणार आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.
जिल्ह्यात गंगाखेड, जिंतूर, मानवत, पाथरी, पूर्णा, सेलू, सोनपेठ येथे नगरपालिका आहेत. जिंतूरवगळता इतर सहा नगरपालिकांच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांची मुदत २० जूनला, तर जिंतूर पालिकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षाची मुदत २७ जूनला संपली. तत्पूर्वी सरकारने विधानसभा निवडणुकीचे कारण पुढे करीत विद्यमान अध्यक्ष-उपाध्यक्षांना ६ महिन्यांची मुदतवाढ दिली. परंतु काही सदस्यांनी मात्र या मुदतवाढीला न्यायालयात आव्हान दिल्यानंतर सरकारने मुदतवाढीचा निर्णय रद्द केला. त्यामुळे पुढील अडीच वर्षांसाठी अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीचा मार्ग सुकर झाला आहे.
जिल्हाधिकारी एस. पी. सिंह यांनी नगर पंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. दि. ७ व ८ जुलस नामनिर्देशनपत्र दाखल करणे, ८ जुलला दुपारी दोननंतर नामनिर्देशनपत्राची छाननी होऊन फेटाळलेल्या नामनिर्देशनपत्राची यादी प्रसिद्धी, नामनिर्देशन पत्रासंबंधी आक्षेप असल्यास ९ जुलला सुनावणी, त्याच दिवशी सायंकाळी पाचनंतर वैध नामनिर्दिष्ट उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. दि. १० जुलस नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची मुदत आहे. एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास ११ जुलस नगर परिषद सभागृहात अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीसाठी पीठासीन अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा होईल. गंगाखेड, पाथरी, पूर्णा येथे उपविभागीय अधिकारी हे पीठासीन अधिकारी असतील, तर जिंतूर येथे पुनर्वसनचे उपजिल्हाधिकारी, मानवतला जिल्हा पुरवठा अधिकारी, सेलूला उपजिल्हा निवडणूक अधिकारी व सोनपेठ येथे रोहयोचे उपजिल्हाधिकारी पीठासीन अधिकारी आहेत.
असे आहे आरक्षण
पुढील अडीच वर्षांसाठी अध्यक्षांचे आरक्षण याप्रमाणे : गंगाखेड (ओबीसी महिला), जिंतूर (ओबीसी महिला), मानवत (खुला प्रवर्ग महिला), पाथरी (खुला प्रवर्ग), पूर्णा (खुला प्रवर्ग), सेलू (ओबीसी) व सोनपेठ (अनुसूचित जाती).