शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार बबनराव घोलप यांच्या प्रचाराच्या नियोजनासंदर्भात उद्या (शुक्रवार) शिर्डी येथे शिवसेना पदाधिका-यांची बैठक आयोजित करण्यात आली असून, पदाधिका-यांची नाराजी दूर करून त्यांना प्रचाराच्या कामाला लावले जाणार आहे. घोलप यांच्यावरील उपरे व भ्रष्टाचाराचे आरोप सुरू झाले असून ते खोडून काढण्यासाठी पदाधिका-यांना बैठकीत मार्गदर्शन केले जाणार आहे.
घोलप यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सेनेचे संपर्कप्रमुख सुहास सामंत, रवींद्र मिर्लेकर व शशिकांत गाडे यांनी तालुकानिहाय शिवसेनेच्या प्रमुख पदाधिका-यांच्या बैठका घेतल्या. या वेळी संघटनात्मक पातळीवर निराशाजनक चित्र दिसून आले. सेनेत मोठय़ा प्रमाणात अंतर्गत गटबाजी व धुसफूस आहे. त्यामुळे ती दूर करण्याकरिता प्रयत्न सुरू झाले आहेत. बैठकीत घोलप, सामंत, जिल्हाध्यक्ष खेवरे व गाडे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना बैठकीस निमंत्रित करण्यात आलेले नाही.
खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या काळात पदाधिकारी नेमताना त्यांनी मोठय़ा प्रमाणावर हस्तक्षेप केला. त्यांच्या मर्जीतील काही पदाधिकारी नेमले. त्यावरून निष्ठावंत शिवसैनिकात नाराजी होती. सेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत हे वाद गेले. पण संपर्कप्रमुख सामंत यांनी वाकचौरे यांना दुखावू नका असे आदेश दिले होते. आता वाकचौरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर निष्ठावंत शिवसैनिकांनी पदाधिकारी बदलाची मागणी केली होती. सेनेचे संपर्कनेते राजेश सपकाळ यांनी काही निष्ठावंत शिवसैनिकांना दूर केले होते. आता सपकाळ यांचा पदभार काढून घेण्यात आला असून त्यांच्या अन्य जिल्ह्यांत जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
घोलप हे शनिवारी (दि.२२) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांचे मुख्य प्रचार कार्यालय शिर्डी येथे सुरू करण्यात आले आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी प्रचार कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. घोलप यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात येत आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी त्यांच्याविरुद्ध जाहीर सभा घेण्याचे स्पष्ट केले आहे. तसेच काँग्रेसने घोलप हे उपरे उमेदवार आहेत, असा प्रचार सुरू केला आहे. तो प्रचार खोडून काढण्यासाठी शिवसैनिकांना उद्याच्या बैठकीत मार्गदर्शन केले जाणार आहे.