छत्रपती शिवाजीमहाराज यांची तिथीनुसार आलेली जयंती शहरातील हिंदुत्ववादी संघटना व पक्षांच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथेनुसार सायंकाळी शहरातून मोठी मिरवणूक काढण्यात आली, मात्र डीजेनेच या मिरवणुकीच्या भव्यतेला गालबोट लावले.
शहरातील विविध चौकांमध्ये सकाळपासूनच शिवजयंतीचा उत्साह होता. तिथीनुसार येणाऱ्या शिवजयंतीवर शिवसेनेचा प्रभाव आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील अनेक मंडळांनी चौकाचौकांत छत्रपतींच्या जीवनावरील देखावे उभे केले होते. सायंकाळी ५ वाजता जुन्या बसस्थानकावरील छत्रपती शिवाजीमहाराजांच्या अश्वारूढ पुतळय़ाला अभिवादन करून मिरवणुकीला प्रारंभ झाला. मिरवणुकीतच सुरुवातीला गर्दी कमीच होते. शिवाय दोन वाहनांमध्ये अंतरही मोठे होते. मिरवणुकीत अग्रभागी घोडेस्वार होते. शिवसेनेसह महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेनेच्या अधिपत्याखालील मंडळांची वाहने मिरवणुकीत सहभागी झाली होती. काही मंडळांनी छत्रपतींच्या जीवनावरील देखावेही मिरवणुकीत सहभागी केले होते. मात्र अपवाद वगळता बहुसंख्य मंडळांनी पारंपरिक ढोलताशांऐवजी डीजेचेच ओंगळवाणे प्रदर्शन केले. मिरवणुकीच्या मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.