देशाच्या तुलनेत राज्याची मतदानाची टक्केवारी कमी असण्याच्या पाश्र्वभूमीवर मतदारांना प्रोत्साहित करण्याच्या हेतूने वर्धा जिल्हा निवडणूक कार्यालयाने आकर्षक बोधवाक्यांची मोठी  होर्डिग्ज तयार केली असून राज्यात हा पहिलाच असा उपक्रम ठरला आहे.
लोकसभा निवडणुकीवेळी देशाच्या मतदानाच्या तुलनेत महाराष्ट्राची टक्केवारी कमी असल्याचे आढळून आले होते. राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्ह्य़ांना या विषयी दक्ष होण्याच्या सूचना दिल्या. राज्याची टक्केवारी एक हजार मतदारामागे ८२५ एवढी तर वर्धा जिल्ह्य़ाची ८४० अशी राहिली असून राष्ट्रीय पातळीवर ९०० चे प्रमाण आहे. त्यातही पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांचे प्रमाण कमीच आहे. हा संदर्भ ठेवून जिल्हा निवडणूक यंत्रणेने मतदारांना मतदान केंद्राकडे आकर्षित करण्याच्या हेतूने ठिकठिकाणी होर्डिग्ज लावण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य निवडणूक आयोगाने तयार केलेल्या पोस्टर्सशिवाय ही स्वतंत्र अशी होर्डिग्ज राहणार आहेत.
येथील चित्र रेखाटनतज्ज्ञ अंकुश कत्रोजवार यांच्या दृष्टीतून ही पोस्टर्स साकारली आहे. महिला, ग्रामीण मतदार व युवकांना प्रोत्साहित करण्याचा यामागे प्रमुख हेतू आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या निवडणुकीविषयी ग्रामगीतेत असणाऱ्या ओळींचा यात वापर करण्यात आला आहे.
किमान शंभर होर्डिग्ज चारही मतदारसंघात लावण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती निवडणूक कार्यालयाचे अनिल गडेकर यांनी दिली. यावरील खर्चास जिल्हा निवडणूक अधिकारी नवीन एस. सोना यांनी राज्य आयोगाच्या मंजुरीअंती परवानगी दिली.
राज्य आयोगाने मतदार जागृतीसाठी  अभिनेत्री मृणाल कुळकर्णीच्या छबीचे पोस्टर्स दिले. त्या व्यतिरिक्त असा हा राज्यातील पहिलाच उपक्रम आहे.