शासकीय खिचडी वाटपासाठी सामाजिक अंतराचा फज्जा; विषाणू संक्रमणाची भीती
विरार : टाळेबंदीत खिचडी वाटप केले जात आहे. यासाठी शेकडोच्या रांगा लागत आहेत. या रांगांमध्ये गर्दी होत आहे. त्यामुळे सामाजिक अंतर राखण्याच्या नियमाचा फज्जा उडाला आहे. त्यामुळे या योजनांतूनच करोना विषाणू संक्रमण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
वसई-विरारमध्ये शिधा दुकानातील धान्य मिळत नसल्याने शासनाच्या अन्नछत्रात मिळणाऱ्या खिचडीसाठी शेकडो नागरिक रणरणत्या उन्हात रांगा लावत आहेत. या वेळी सामाजिक अंतराचा फज्जा उडवत असल्याचे दिसत आहेत. रांगेत उभे राहिलेले नागरिक करोना संसर्ग होऊ नये म्हणून कोणतीही काळजी घेताना दिसत नाहीत. अनेक जण खिचडीच्या टेम्पोची वाट पाहत उन्हात रांगेत उभे राहतात आणि टेम्पो आल्यानंतर एकच झुंबड उडते. खिचडी मिळविण्यासाठी नागरिकांची होणारी गर्दी करोनाचा प्रसार होण्यास कारणीभूत होऊ शकते.
या रांगेत एकाला एकच खिचडीचे पाकीट मिळत असल्याने घरातील सर्वच सदस्य रांगेत उभे राहतात. यात लहान मुलापासून ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचाही समावेश असतो. रांगेत उभे राहत असताना दोन व्यक्तींमधील योग्य अंतर राखले जात नाही. तसेच अनेक नागरिक हे तोंडाभोवती कापडी आवरण न घालता या रांगेत उभे राहतात.
नियोजनाची मागणी
वसई तहसील कार्यालयाच्या वतीने वसई-विरारमध्ये सामुदायिक स्वयंपाकगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. तालुक्यात ६३ ठिकाणी टाळेबंदीत नागरिकांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, या ठिकाणी अन्न वितरित करताना कोणत्याही शासकीय नियमांचे पालन होताना दिसत नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे गर्दीचे नियोजन करण्याची मागणी केली जात आहे.
