|| मिल्टन सौदिया
पाठिंबा मिळवण्यासाठी अनेक राजकीय पक्षांचे प्रयत्न :- वसई विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या प्रचाराचा ज्वर दिवसेंदिवस वाढू लागला असून यानिमित्ताने वसईतील विविध सामाजिक संघटनांचा कल जाणून घेण्याची उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे. वसईच्या सामाजिक क्षेत्रात या संघटना महत्त्वपूर्ण असल्याने त्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी अनेक राजकीय पक्षांनी प्रयत्न सुरू केले आहेत. काही संघटनांनी महायुती व बविआला पाठिंबा देऊन प्रचाराला सुरुवातही केली तर काही संघटनांनी तटस्थ भूमिका घेतली आहे.
वसईत अनेक सामाजिक संघटना सक्रिय आहेत. या संघटनांनी वसईच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जडणघडणीत वेळोवेळी महत्त्वपूर्ण भूमिका निभावल्या आहेत. याबाबतीत हरित वसई संरक्षण समिती, निर्भय जनमंच, पर्यावरण संवर्धन समिती, समाजशुद्धी अभियान, हरित वैभव बचाव समिती, जागरूक नागरिक मंच, नागरी व्यवस्था परिवर्तन समिती आदी संघटनांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. निवडणुका आल्या की या संघटनांच्या राजकीय भूमिकेकडेही वसईकरांचे लक्ष लागून राहते. यावेळी वसई विधानसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर आणि महायुतीचे विजय पाटील यांच्यात तुल्यबळ लढत होत असताना वसईच्या सामाजिक संघटनांचा कल नेमका कोणत्या बाजूने आहे याबाबत अनेकांना उत्सुकता आहे.
वसईत ९०च्या दशकातील दहशत आणि पर्यावरणाच्या ऱ्हासाविरुद्ध अभूतपूर्व लढा दिलेल्या हरित वसई संरक्षण समितीने यावेळी आपल्या भागाचे संरक्षण आणि पर्यावरणाचे संवर्धन करणाऱ्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. समितीच्या कार्यकर्त्यांना स्वत:चे मत आहे. त्यानुसार त्यांनी विचार करून वसई-विरारच्या भूभागाचे आणि पर्यावरणाचे संरक्षण करणाऱ्या उमेदवाराला मतदान करण्याचा आदेशच कार्यकर्त्यांना दिला आहे, असे समितीचे अध्यक्ष मार्कुस डाबरे यांनी स्पष्ट केले. वसईच्या विविध सामाजिक प्रश्नांवरून सातत्याने आवाज उठवणाऱ्या ‘निर्भय जनमंच’ या संघटनेने मात्र विजय पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे, असे संघटनेचे कार्याध्यक्ष जॉन परेरा यांनी सांगितले.
निर्भय जनमंच ही समाजवादी विचारांच्या कार्यकर्त्यांची संघटना आहे. मात्र, त्यांनी शिवसेना-भाजप महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केल्यामुळे सर्वाच्याच भुवया उंचावल्या आहेत.
निर्णायक ख्रिस्ती मते कोणाच्या पारडय़ात?
वसई मतदारसंघातील बदललेल्या राजकीय भूमिकेमुळे वसईतील निर्णायक असलेल्या ख्रिस्ती मतदारांच्या भूमिकेकडेही साऱ्यांचे लक्ष लागले आहे. वसई विधानसभा मतदारसंघात यंदाही काँग्रेसने उमेदवार न देता बहुजन विकास आघाडीचे उमेदवार हितेंद्र ठाकूर यांना पाठिंबा दिला आहे. वसईतील ख्रिस्ती समाज आणि सामाजिक संघटना बविआ आणि जातीयवादाविरोधात असल्याने या निवडणुकीत त्यांच्यापुढे पेच निर्माण झाला आहे. हा मतदारसंघ पश्चिमेकडे अर्नाळा ते नायगाव आणि पूर्वेला जूचंद्र ते कामण-पोमण असा पसरला आहे. यात एक लाखाच्या आसपास कॅथॉलिक मते आहेत. यामध्ये नायगावपासून, वसई कोळीवाडा, अर्नाळा या ठिकाणी राहणाऱ्या ख्रिश्चन कोळी मतांची संख्याही मोठी आहे.