जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा येथे दहशतवाद्यांशी लढताना नाशिक जिल्ह्यातील जवान अर्जुन प्रभाकर वाळुंज यांना वीरमरण आले आहे. चांदवड तालुक्यातील भरवीर येथील ते रहिवासी होते. या घटनेमुळे चांदवड तालुक्यावर शोककळा पसरली आहे. उद्या, वाळुंज यांचे पार्थिव मुंबईत आणण्यात येणार येईल त्यानंतर मंगळवारी मूळगावी भरवीर येथे त्यांच्यांवर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
भारतात दहशतवादी घुसवण्याच्या उद्देशाने पाकिस्ताननं रविवारी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. जम्मू काश्मीरमधील तंगधार सेक्टरमध्येे पाकिस्तानी सैन्याने अंदाधुंद गोळीबार केला. पाककडून केल्या जाणाऱ्या गोळीबाराला भारतीय लष्कराकडून प्रत्युत्तर देण्यात आलं. मात्र, प्रत्युत्तर देताना दोन भारतीय जवानांना वीरमरण आलं. तर एका नागरिकाचाही मृत्यु झाला. त्यानंतर घुसखोरी हाणून पाडत भारतीय लष्कराने सीमेलगत पाकच्या हद्दीत असलेली अनेक दहशतवादी कॅम्प उद्ध्वस्त केले.
पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारानंतर घुसखोरीच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांच्या तळांवर भारतीय लष्कराने हल्ला चढवला होता. दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी उखळी तोफांचा वापर करण्यात आला. भारतीय लष्कराने केलेल्या धडाकेबाज कारवाईत नीलम व्हॅलीतील चार दहशतवादी कॅम्प उद्ध्वस्त केले आहेत. भारताने केलेल्या प्रतिहल्ल्यात पाकिस्तानच्या चार ते पाच सैनिकांसह २० ते २२ दहशतवादी ठार झाले आहेत.