महाराष्ट्र, मध्य प्रदेशातील शेतकरी संकटात
आफ्रिकेतून केवळ २ हजार ५४० रुपये प्रतिक्विंटल दराने गेल्या सहा महिन्यांत ४० हजार ८०० टन सोयाबीनची आयात झाल्यामुळे देशांतर्गत सोयाबीनचे भाव पडले असून, यामुळे सोयाबीनचे भाव आगामी काळात वाढणार नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
दरवर्षी सोयाबीन बाजारपेठेत आल्यानंतर बहुराष्ट्रीय कंपन्या आवक वाढली म्हणून भाव पाडतात व कमी भावात माल खरेदी करतात. चार महिन्यांनंतर तोच माल आवक घटली म्हणून बाजारात विकतात व प्रतििक्वटल ५०० रुपयांपेक्षा अधिक चढय़ा भावाने नफा कमावतात. शेतकऱ्यांचा माल बाजारपेठेत येतो तेव्हा कमी भावात त्याला विकावे लागू नये, यासाठी शासनाच्या वतीने शेतकऱ्यांनी गोदामात माल ठेवण्याची व्यवस्था केली. केवळ ६ टक्के व्याजदराने त्याला कर्जही उपलब्ध करून देण्यात आले. जेव्हा भाव मिळतो तेव्हा सोयाबीन विकण्याची सोय शेतकऱ्यांना असते. त्यामुळे आíथक अडचणही दूर झाली व सोयाबीनला योग्य भाव आल्यानंतर विकता आल्यामुळे नफाही मिळाला. असा शेतकऱ्यांचा दुहेरी फायदा होत होता.
गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी केवळ सहा महिन्यांत सोयाबीनची दुपटीने आयात भारतीय संस्थांनी केली आहे. आफ्रिकेतील देशातील शेतकऱ्यांना दिलेली सवलत भारतीय शेतकऱ्यांना अडचणीची ठरते आहे. या वर्षी अगोदरच अतिवृष्टी झाल्यामुळे सोयाबीनचे नुकसान झाले व हमीभावापेक्षा कमी भावाने सोयाबीन विकावे लागले. ज्यांच्याकडे थोडेबहुत सोयाबीन शिल्लक होते त्यांनी ते वाळवून, नीट करून चार महिन्यांनंतर भाव वाढतील या आशेने ठेवले होते. या वर्षी देशभरात सुमारे १०९ लाख ७१ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला व सुमारे ११५ लाख टन उत्पादन झाले. आफ्रिकेतील अतिमागास देशांना आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार निर्यातीच्या विशेष सवलती आहेत. भारतात सोयाबीनच्या आयातीवर ३० टक्के आयातशुल्क आहेत. मात्र, आफ्रिकेतील या अतिमागास देशासाठी ही आयातकर पूर्णपणे माफ करण्यात आली आहे. या सवलतीचा लाभ घेत काही मंडळी मोठय़ा प्रमाणावर सोयाबीनची आयात करत आहेत आणि त्यामुळे देशांतर्गत सोयाबीनचे भाव पडले आहेत.
देशात मध्य प्रदेश व महाराष्ट्र या दोन प्रांतांत सोयाबीनचे विक्रमी उत्पादन होते. त्यामुळे या प्रांतातील शेतकऱ्यांना याचा अधिक फटका बसतो आहे. इथिओपियातून येणाऱ्या सोयाबीनवर आंतरराष्ट्रीय नफेखोर सवलती मिळवत आहेत. प्रक्रिया उद्योजकांनी हा माल मोठय़ा प्रमाणावर खरेदी करणे सुरू केले आहे. भारतातील ५२ टक्के सोयाबानीचे उत्पादन मध्य प्रदेशात होते, दुसरा क्रमांक महाराष्ट्राचा आहे. खरिपाच्या क्षेत्रात कापसाइतकेच सोयाबीनचे क्षेत्र आहे. जगातील सोयाबीन उत्पादन करणारा पाचव्या क्रमांकाचा देश म्हणून आज भारत ओळखला जातो आहे.