हिवाळ्यातला पावसाळा शेतकऱ्याच्या मुळावर

परभणी : जिल्ह्यात काही मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याने आणि अद्यापही पावसाने उघडीप न दिल्याने बहुतांश भागात पिकांचे झालेले नुकसान मोठे असून प्रत्यक्ष पंचनामे झाल्यानंतर या नुकसानीचा अंदाज येणार आहे. आजतरी काढणीला आलेले सोयाबीन पूर्णपणे शेतकऱ्यांच्या हातून गेले असून वेचणीला आलेला कापूसही मातीमोल झाला आहे.

परतीच्या पावसाने जिल्ह्यात दाणादाण उडवली आहे. अद्याप महसूल यंत्रणेने प्रत्यक्ष सर्वेक्षणाला सुरुवात केलेली नाही. पावसाचे वातावरण पूर्णपणे निवळल्यानंतर पंचनाम्यास प्रारंभ होईल, सध्या मात्र पावसाने अक्षरश: कहर केला आहे. काढणीला आलेल्या सोयाबीनला मोड फुटले आहेत. हा पाऊस इतका संततधार आहे की तो सोयाबीनच्या काढणीला उसंतही देत नाही. गुरुवारी रात्रभर पावसाने हजेरी लावली. आज दिवसभरही पावसाच्या सरी अधूनमधून कोसळत आहेत. बाजरीच्या कणसालाही अंकुर फुटले असून वेचणीला आलेला कापूस परतीच्या पावसात मातीमोल झाला आहे. फुटलेल्या कापसाच्या बोंडातील सरकीलाही आता कोंब फुटले असून कापसाच्या वेचण्याचे काम पावसामुळे थांबले आहे. जमिनीत पाणी असल्याने वेचणीसाठी शेतात मजूर जाऊ शकत नाहीत. फुटलेला कापूस वेचायला कसा आणि ओला झालेला कापूस वाळवायचा कसा या विवंचनेने सध्या शेतकऱ्यांना घेरले आहे. शेतातला सर्व कापूस भिजल्याने बाजारात फार मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. मात्र, त्याआधी कापूस वेचणी करणेच दुरापास्त झाले असून फुटलेल्या कापसाची माती होताना शेतकऱ्यांना पाहावे लागत आहे.

या वर्षी कापूस, सोयाबीन ही दोन्ही पिके चांगल्या स्थितीत होती. मात्र, परतीच्या पावसाने घात केल्याने खरिपाची ही दोन्ही मुख्य पिके शेतकऱ्यांच्या हातून गेले आहेत, तर ज्वारी व हरभऱ्याच्या पेरणीलाही पावसाने सुरुवातीलाच नष्ट करून टाकले आहे. ही पेरणी दुबार करायची तर उघाडही नाही आणि पाऊस थांबायलाही तयार नाही त्यामुळे सध्या शेतकरी त्रस्त झाले आहेत. दरम्यान जिल्ह्यात सर्व तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे अर्जाद्वारे शेतकऱ्यांनी आपली नुकसानीची माहिती दिली असून अद्यापही पीक विमा कंपनीच्या कोणत्याही हालचाली दिसत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.