करोना ताळेबंदीमुळे रोजगार गमवावा लागलेल्या कामगारांना शासनाकडून अर्थसहाय्य प्राप्त व्हावे, या मागणीसाठी इचलकरंजी येथे मंगळवारी कामगारांनी व लालबावटा कामगार संघटनेने बैलगाडीतून जावून सहाय्यक कामगार आयुक्तांना निवेदन सादर केले. दरमहा ५ हजार रुपये अनुदान द्यावे, कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावे अशी मागणी करण्यात आली. मागण्याबाबत शासनाकडे पत्रव्यवहार करण्यात येत आहे, असे सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे – यादव यांनी कामगारांना सांगितले.

टाळेबंदीमुळे औद्योगिक शहर असलेल्या इचलकरंजीत यंत्रमाग, सायझिंग, गारमेंट, प्रोसेस आदी वस्त्रोद्योगातील सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. कामगारांना सुरुवातीच्या काळात कारखानदारांकडून आर्थिक मदत करण्यात आली. टाळेबंदीचा काळ पुढे सरकला तसा कारखानदारांकडून मदतीचा ओघ कमी झाला. हजारो कामगारांना उदरनिर्वाह करणे कठीण झाले होते.

आता काही प्रमाणामध्ये यंत्रमाग काळाची चक्रे सुरू झाली आहे. मात्र मधल्या अडीच महिन्याच्या कालावधीत कामगारांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. त्यांना अर्थ साहाय्य मिळावे,या मागणीसाठी लालबावटा कामगार संघटनेने आज बैलगाडीतून कामगार कार्यालयात जावून निवेदन सादर केले. सुमारे ११ हजार कामगारांचे मागणीचे अर्ज सादर करण्यात आले. यावेळी शिवगोंडा खोत, दत्ता माने, भरमा कांबळे, शोभा शिंदे, सदा मलाबादे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.