सार्वजनिक आरोग्यसेवेतील महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेने २ जूनपासून असहकार (कामबंद)आंदोलन जाहीर केले आहे. स्थायी, अस्थायी, कंत्राटी अधिका-यांच्या संघटना त्यात सहभागी होणार आहेत.
जिल्हा संघटनेच्या वतीने आज, गुरुवारी यासंदर्भात जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. पी. डी. गंडाळ व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कांबळे यांना डॉ. प्रमोद म्हस्के, डॉ. अनिल ससाणे, डॉ. रवि गोरडे, डॉ. भगवान दराडे, डॉ. देवीदास लव्हाटे, डॉ. दत्ता जोशी, डॉ. प्रज्ञा भगत, डॉ. के. एन. पोहरे आदींच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले.
संघटनेच्या निवेदनात म्हटले, की विविध मागण्यांसाठी ऑक्टोबर २०११ मध्ये राज्यभर असहकार आंदोलन केले. त्यातील काहीच मागण्या सरकारने मंजूर केल्या. अनेक मागण्या मान्य करूनही प्रलंबित राहिल्या आहेत. प्रलंबित मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संघटना सरकारशी चर्चा करणार नाही.
सन २००९-१० मध्ये सेवा समावेश झालेल्या वैद्यकीय अधिका-यांना पूर्वलक्ष्यी लाभ मिळावा, अस्थायी ७८९ बीएएमएस व अस्थायी ३२ बीडीएस वैद्यकीय अधिका-यांचे सेवा समावेशन करावे, १ सप्टेंबर २००६ पासून सर्वच वैद्यकीय अधिका-यांना सहावा वेतन आयोग लागू करावा, केंद्र सरकार व वैद्यकीय उच्च शिक्षण विभागाप्रमाणे वेतन मिळावे, पदव्युत्तर व पदविकाधारक अधिका-यांच्या पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लागावा, केंद्र सरकारप्रमाणे कामाचे तास ठरवावेत, एनपीए ऐच्छिक असण्याबाबत कार्यवाही करावी, सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६२ करावे, आरोग्य विभागाचा पुनर्रचना आयोग स्थापन करावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stop working movement of medical officers from 2 june