काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा असताना त्यावर आता सत्यजीत तांबे यांचे वडील आणि थोरात यांचे मेव्हणे डॉ. सुधीर तांबे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “ही व्यथित होणारी गोष्ट आहे. बाळासाहेब थोरात हे ज्येष्ठ नेते आहेत. काँग्रेसच्या विचारांवर त्यांची निष्ठा आहे. माझी त्यांची चर्चा झालेली नाही, मात्र त्यांना हा निर्णय घेण्याची वेळ का आली? यावर विचार व्हायला हवा.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बाळासाहेब थोरात यांना विश्वासात घ्यायला हवं होतं

सुधीर तांबे पुढे म्हणाले, “जेव्हा एखादी व्यक्ती पक्षाच्या विचारधारेशी जोडलेली आहे. पक्षासाठी समर्पित भावनेने काम करत असताना त्यांना विश्वासात न घेणे किंवा एखाद्या निर्णयात सहभागी करुन न घेणं, हे योग्य नाही. ते विधीमंडळ पक्षनेते आहेत, त्यांच्याशी चर्चा व्हायला हवी होती, असे मला वाटते. काँग्रेसच्या अडचणीच्या काळात ज्यांनी नेतृत्व केलं. काँग्रेसच्या सर्व कार्यक्रमात झोकून देऊन काम केले. याबाबत पक्षश्रेष्ठींनी गंभीर होऊन विचार केला पाहीजे.”

हे वाचा >> बाळासाहेब थोरातांनी राजीनामा दिल्याची चर्चा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, “त्यांचा आणखी राजकीय…”

बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना तांबे म्हणाले की, थोरात यांनी राजीनामा दिला हे मला माध्यमात आलेल्या बातम्यातून समजत आहे. मी प्रवासात असल्यामुळे याबाबत माहिती घेतलेली नाही. विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा हा हायकंमाडकडे देणे अपेक्षित आहे, त्यासाठी प्रदेश काँग्रेसशी चर्चा करण्याची आवश्यकता नाही. मात्र त्याबाबत मला अधिक माहिती नाही.

सत्यजीत तांबेंच्या मामा थोरात यांना शुभेच्छा

दरम्यान बाळासाहेब थोरात यांचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे अनेक नेते त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. पण सत्यजीत तांबे यांनी दिलेल्या शुभेच्छा लक्षवेधी ठरत आहेत. थोरात हे सत्यजीत तांबे यांचे मामा आहेत. त्यामुळे आपल्या मामाला शुभेच्छा देताना सत्यजीत तांबे यांनी, “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आबा!” असे कॅप्शन देऊन ट्विट केले आहे. या ट्विटवर आता नेटीझन्स आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sudhir tambe raction on speculations of resignation by balasaheb thorat kvg
First published on: 07-02-2023 at 11:49 IST