विरार : नालासोपारा पूर्व येथील नालेश्वरनगर परिसरात गेल्या २६ मे ला एका तरुणाने आपल्या मित्राच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी मृत तरुणाच्या वडिलांनी तक्रार दाखल केली होती. मात्र, तब्बल पाच महिन्यांनी पोलिसांकडून २९ ऑक्टोबरला कलम ३०६ नुसार त्याच्या मित्रावर तुळिंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नारेश्वर नगर येथील शुभम अपार्टमेंटमध्ये उजाला लालजी मौर्या (२२) आपल्या कुटुंबासोबत राहत होता. याच परिसरात राहणाऱ्या राहुल दुबेकडे तो कामाला जात असे. उजालाची घरची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती त्यात राहुलने त्याचा तीन महिन्यांचा पगार अडकून ठेवला होता. घरची परिस्थिती ठीक नसल्याने तो राहुलकडे सतत पगार मागत होता. त्यातच त्याचा जवळचा मित्र राजकुमार ऊर्फ गोलूच्या वडिलांना कॅन्सर झाला होता. त्यांच्या उपचारासाठी गोलू उजालाकडे पैसे मागत होता. मात्र, त्याच्याकडे पैसे नसल्याने तो त्याला मदत करू शकला नाही. दरम्यान, तेव्हाच गोलू राहुलकडे उजालाचा पगार देण्यास सांगू लागला त्यामुळे राहुलने युक्ती करत गोलूला सांगितले की, उजालाच्या नावावर नवीन मोबाईल लोनवर घेऊन विकून त्यामधून येणाऱ्या पैशातून वडिलांवर उपचार करू आणि उरलेले पैसे उजालाला देऊ  असे म्हणाला. पण ते सर्व पैसे राहुलने खर्च केले. काही दिवसांनी बँकेतून उजालाला लोनची रक्कम मागण्यासाठी फोन येऊ  लागले. मात्र, घरची परिस्थिती आणि बँकेच्या त्रासाला कंटाळून त्यांनी अखेर आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आणि २६ मे ला घराच्या जवळील इमारतीमध्ये गळफास लावून घेतला. पण आत्महत्या करण्याआधी त्याने स्वत:चा सेल्फी काढून राहुलला पाठवला व त्यावर त्याने ‘गुड फासी लावून घे’ असे म्हणाला. या सर्व त्रासाला कंटाळून अखेर उजालाने आत्महत्या केली. या प्रकरणी पाच महिन्यांनी पोलिसांकडून गुन्हेगाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.