राहाता : गेल्या काही दिवसांपासून शिर्डीतील साईबाबा संस्थान असो की शिर्डी शहरातील गुन्हेगारी, अतिक्रमणे, भिक्षेकऱ्यांच्या प्रश्नावर माजी खासदार डॉ. सुजय विखे आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. खरेतर पालकमंत्रिपद त्यांचे वडील राधाकृष्ण विखे यांच्याकडेच आहे. तरीही चिरंजीव आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. त्यांनी अद्याप सुजय विखे यांच्या या भूमिकेवर जाहीर प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.
आंतरराष्ट्रीय पातळीवरील धार्मिकक्षेत्र म्हणून शिर्डी नावारूपास आले आहे. माजी खासदार विखे यांची ही भूमिका जगभरातील साईभक्तांमध्ये शिर्डीची प्रतिमा उंचावण्यासाठी किती उपयोगी पडते, हे आगामी काळात दिसणार आहे सध्या राखीव असलेला शिर्डी लोकसभा मतदारसंघ, पुढील निवडणुकीत, मतदारसंघ फेररचनेमुळे खुला होण्याची शक्यता वर्तवली जाते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सध्या रखडल्या असल्या तरी पावसाळ्यानंतर त्या मार्गी लागण्याची शक्यता आहे. त्यामध्ये शिर्डी नगरपंचायतीचाही समावेश आहे. काही दिवसांपूर्वी सुजय विखे यांनी त्यांच्या स्वतःच्या राजकीय पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर आणला होता, त्याचवेळी ते आक्रमक भूमिका घेताना दिसू लागले आहेत.
पद्मश्री विखे पाटील साखर कारखान्याची निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली. या निवडणुकीत धक्कातंत्राचा अवलंब करत सुजय यांनी अनेक नवीन तरुण चेहऱ्यांना संधी दिली. त्यामुळे आगामी निवडणुकांतही धक्कातंत्राचा वापर त्यांच्याकडून केला जाण्याची शक्यता अधिक दिसते. श्रद्धा व सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातील भाविक मोठ्या संख्येने येतात. हार, फुले, प्रसाद, हॉटेल, लॉजिंग, आरामबस या माध्यमातून साईभक्तांची मोठी आर्थिक लूट होते. त्यातून शिर्डीत गुन्हेगारी टोळ्यांनी बस्तान बसवल्याने शिर्डीतील या वेगळ्या बाजूचीही चर्चा होऊ लागली आहे. शिर्डीतील राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी, अतिक्रमणे अशा विविध प्रश्नांवर सुजय विखे आपली भूमिका मांडू लागलेले आहेत.
शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी, जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी तीन वर्षांपूर्वी शिर्डी शहर गुन्हेगारीमुक्त करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या होत्या. त्यांच्या या सूचनांना अधिकाऱ्यांनी हरताळ फासल्याने गुन्हेगारी वाढीस लागली. स्थानिक साईबाबा संस्थानच्या व्हीआयपी दर्शनाला आळा घालण्यासाठी संस्थानच्या विरोधात उपोषणाचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे व्हीआयपी दर्शनाचा प्रश्न मार्गी लागणार की तो आणखी वादग्रस्त बनणार हे आगामी काळात दिसेलच.
व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली संस्थानचे काही अधिकारी, कर्मचारी तसेच विखे यांच्या नावाचा वापर करणारे तथाकथित कार्यकर्ते अचानक वैभवसंपन्न झाल्याचे दिसते. या लोकांचाही बंदोबस्त करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. सुजय विखे यांच्या या भूमिकेचे सर्वसामान्यांकडून स्वागतच होत आहे. त्यातून देश-विदेशातून शिर्डीत येणाऱ्या साईभक्तांना दिलासाही मिळणार आहे. मात्र त्यांच्या या आक्रमक भूमिकेचा अनेकांनी धसकाही घेतला आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर सुजय विखे यांच्या भूमिकेत झालेला हा बदल आहे. त्यातून शिर्डीतील अनेक स्वयंघोषित नेते, कार्यकर्ते, विखे यांच्या जवळकीचा फायदा घेणारे घायाळही झाले आहेत. अलीकडील काळात विविध राजकीय पक्षांनी शिर्डीत सातत्याने विचार मंथनाची शिबिरे घेतली. शिर्डी शहरातील बिघडलेल्या परिस्थितीकडे कोणाचेही लक्ष गेले नाही. तत्पूर्वीच सुजय विखे यांनी स्वतःच्या भूमिकेत बदल घडवत शिर्डीच्या प्रश्नांना हात घातला आहे.