भाजपकडून दुसऱ्यांदा आमदार झाल्यानंतर राष्ट्रवादीशी घरोबा करणाऱ्या सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून विश्वास संपादन केला. मात्र, चार वर्षे ‘भाजप बंडखोर’ ही बिरुदावली घेऊन राष्ट्रवादीत वावरणाऱ्या धस यांची अखेर लाल दिव्याची स्वप्नपूर्ती झाली. बीडमधील लोकसभेचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादीने त्यांना पुढे आणल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
धस यांची कारकीर्द नेहमीच वादग्रस्त ठरली आहे. लाल दिवा मिळण्याच्या काही दिवस आधी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. ते फरारही होते. जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांची बदली किंवा शेतकऱ्यांना कर्ज मिळाले नाही म्हणून थेट बँकेत हल्लाबोल करून मोडतोड करण्याच्या प्रकरणामुळे धस यांचा वावर नेहमीच वादग्रस्त ठरला.
लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भाजपचे नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांच्याविरुद्ध कोण सक्षम उमेदवार असेल, याची चाचपणी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडून केली जात आहे. गेल्या वर्षी भाजपमध्ये असलेले अमरसिंह पंडित यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांना विधान परिषदेची आमदारकी देण्यात आली. तेच लोकसभेचे उमेदवार असतील, अशी चर्चा सुरू झाली. मात्र, त्यांच्या नावाला पक्षातून विरोध होऊ लागल्याने पक्षनेतृत्वाने पालकमंत्री क्षीरसागर यांचे नाव चर्चेत आणले. क्षीरसागर लोकसभेसाठी इच्छुक नाहीत. या पाश्र्वभूमीवर धस यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली. धस यांचा जिल्हाभर संपर्क आहे. त्यामुळे लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून धस यांचे नाव पुढे येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. धस यांना मंत्रिपदासाठी आठ वर्षे वाट पाहावी लागली. आष्टी मतदारसंघाला धस यांच्या रूपाने प्रथमच मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. बीड जिल्ह्य़ात युतीचे पाच आमदार. जिल्हा परिषदेसह सर्व स्थानिक संस्थाही भाजपच्याच ताब्यात. खासदार मुंडे यांचा मोठा राजकीय दबदबा. अशा स्थितीत सन २००५ मध्ये जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ११ भाजप सदस्यांचा वेगळा गट करून धस यांनी सत्तांतराचा डाव यशस्वी केला. त्यांनी थेट मुंडे यांच्याविरुद्ध दंड थोपटून राष्ट्रवादीशी घरोबा केला.
गेल्या निवडणुकीत जिल्ह्य़ातील सहापैकी पाच मतदारसंघांत राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले. राज्यात शंभर टक्के यश देणारा हा जिल्हा ठरला. त्यामुळे मंत्रिपदासाठी स्पर्धा सुरू झाली. धस यांची वर्णी लागेल, अशी शक्यता असतानाच धस यांच्यानंतर पक्षात आलेल्या भाजप आमदार प्रकाश सोळंके यांना संधी मिळाली. जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे कॅबिनेट व पालकमंत्रिपद, तर सोळंके राज्यमंत्री असे समीकरण बांधून राष्ट्रवादीचा कारभार सुरू झाला. धस मात्र मंत्रिपदाने हुलकावणी दिल्यामुळे कायम अस्वस्थ होते. अजित पवार यांचे खास विश्वासू म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. मुळात स्वभाव बंडखोर असल्यामुळे धस यांनी अनेकदा धक्कातंत्राचा वापर करीत जिल्ह्य़ात राजकीय खेळ्या खेळल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suresh dhas given minister post for lok sabha candidate