राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (Nationalist Congress Party) हा भारतातील एक राष्ट्रीय पक्ष असून मुख्यत्वे महाराष्ट्रात प्रभावशाली आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी इ.स. १९९९ मध्ये या पक्षाची स्थापना केली, त्यानंतर हा पक्ष भारतीय काँग्रेस पक्षाच्या साथीने इ.स. १९९९ ते २०१४ या कालावधीत महाराष्ट्र राज्यात सत्तेवर राहिला. हा पक्ष २००४ ते २०१४ च्या दरम्यान काँग्रेस प्रणीत संपुआ मध्ये राहून केंद्रीय सरकारमध्येही सहभागी झाला होता.
इटलीत जन्मलेल्या सोनिया गांधींना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेतृत्व करण्याचा हक्क आहे काय? असा प्रश्न उपस्थित केल्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून निष्कासित केलेल्या शरद पवार, पी.ए. संगमा व तारिक अन्वर यांनी २५ मे १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. स्थापनेच्या वेळीच पक्षाने समाजवादी भारतीय काँग्रेस पक्षाला आपल्यात सामावून घेतले. १० वाजून १० मिनिटे ही वेळ दाखविणारे, दोन पाय व गजराची कळ असलेले सदृश (अॅनालॉग) [घड्याळ] हे या पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह आहे.
शरद पवार हे या पक्षाचे अध्यक्ष आहेत. प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे. नवाब मलिक, हसन मुश्रीफ, जयंत पाटील, अजित पवार, धनंजय मुंढे, जितेंद्र आव्हाड, दिपक साळुंखे पाटील, सुनील तटकरे, राजेश टोपे हे या पक्षाचे महत्वाचे नेते आहेत. २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत पराभव पत्करल्यानंतर राष्ट्रवादीने (NCP) शिवसेना आणि इंडियन नॅशनल काँग्रेससोबत हातमिळवणी करून महाविकास आघाडीची स्थापना केली. सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आहे. Read More