शहरातील सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू म्हणून ओळख असणाऱ्या महाकवी कालिदास कलामंदिर या नाटय़गृहाच्या भाडेवाढ प्रस्तावाला शिवसेनेने तीव्र विरोध केल्याने प्रस्ताव फेटाळण्यात आला असून पुढील सर्वसाधारण सभेत हा विषय चर्चेला घेण्यात येईल, अशी माहिती महापालिका स्थायी समितीचे सभापती उद्धव निमसे यांनी दिली.
कालिदास कलामंदिर ही नाशिकची शान आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी भव्य तीन मजली वास्तू आणि वाहनांसाठी प्रशस्त जागा, यामुळे अनेक कार्यक्रमांसाठी नाटय़मंदिराला मागणी असते. कार्यक्रमांच्या स्वरूपानुसार कलामंदिराचे भाडे किमान तीन हजार ते जास्तीत जास्त सहा हजार रुपयांपर्यंत आकारण्यात येते. मध्यंतरी महापालिकेच्या वतीने नाटय़मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले. त्यावेळी बदललेल्या खुच्र्याची स्थिती अद्यापही समाधानकारक नाही. वातानुकूलित अशी शेखी मिरविणाऱ्या नाटय़मंदिराची वातानुकूलित यंत्रणा अपवादात्मक परिस्थितीतच सुरू असते. प्रसाधनगृहात कायम अस्वच्छता असते. विविध नाटय़ प्रयोगांसाठी येणाऱ्या रंगकर्मीनाही आवश्यक सोयीसुविधा मिळत नाहीत. कलावंतांसाठी असणाऱ्या खोल्यांची स्थितीही योग्य नाही. अशा अनेक गैरसोयी असताना महापालिकेच्या वतीने भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मांडण्यात आला.
या प्रस्तावाला शिवसेनेच्या वतीने विरोध दर्शविण्यात आला. अजय बोरस्ते यांनी भाडेवाढ करण्यापेक्षा त्या ठिकाणी महापालिकेने आवश्यक सोयीसुविधा तात्काळ पुरवाव्यात अशी मागणी केली. कलामंदिराच्या बिकट अवस्थेमुळे नाशिकची प्रतिमा संपूर्ण राज्यातील कलाक्षेत्रात मलिन होत असल्याचे त्यांनी मांडले. स्थायी समिती सभापती उद्धव निमसे यांनी भाडेवाढीचा प्रस्ताव फेटाळत असल्याचे जाहीर करत सर्वसाधारण सभेत हा विषय चर्चेस घेण्यात येईल असे सांगितले. भाडेवाढीच्या प्रस्तावाविषयी बोलताना जयप्रकाश जातेगांवकर यांनी मुळात महापालिकेच्या वतीने आकारण्यात येणारे भाडे हे मुंबई, पुण्याच्या तुलनेत अधिक असल्याचे सांगितले. एरवी एका सत्रासाठी तीन हजार रुपये भाडे सांगणारी महापालिका शनिवार व रविवारी १२ ते १५ हजार रुपये भाडे आकारते. याशिवाय सेवा कर आकारण्यात येतो तो वेगळा. महापालिकेने भाडेवाढ करण्यापेक्षा रंगकर्मी तसेच कलामंदिरात मूलभूत सोयीसुविधा पुरवाव्यात असे नमूद केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Talk on kalidas kalamandir fair rate increase application in mahasabha