गेली ३० वर्षे जलसंधारण क्षेत्रात आदर्श गाव ठरलेल्या हिवरे बाजारच्या गावकरी व विद्यार्थ्यांंनी केलेल्या कामाचा हा गौरव आहे, अशी प्रतिक्रिया आदर्शगाव हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाल्यानंतर ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.

पवार म्हणाले, “३० वर्षांपूर्वी गावकरी एकत्र आले. जलसंधारण कामाला प्रारंभ केला. ग्रामसभेत निर्णय होऊ लागले. विद्यार्थी पाण्याचे ऑडिट करू लागले. त्या कामाला सरकारी अधिकाऱ्यांची साथ मिळाली. या कामाचा हा गौरव आहे. गावकऱ्यांचा हा सन्मान आहे. जलसंधारण व पंचायत राज व्यवस्थेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा हुरूप वाढणार आहे.
महात्मा गांधी यांनी खेडय़ाकडे चला असा मंत्र दिला. खेडयात एक विधायक काम उभे राहू शकते. पाणी, पर्यावरण, वनीकरण या माध्यमातून खेडे आदर्श करता येते. महात्मा गांधी यांच्या खेड्यातील माणसांचा हा विचार महत्त्वाचा आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी पंचायत राजच्या माध्यमातून खेड्यांच्या सर्वांगीण विकासाची संकल्पना मांडली. ती ग्रामपंचायतच्या माध्यमातून साकारली. त्या क्षेत्रात काम करीत असलेले सरपंचांना या पुरस्काराने प्रेरणा मिळणार आहे, नव्हे त्यांचा हा गौरव आहे. या विधायक कामाला माध्यमांनी नेहमी साथ केली,” असं सांगत पवार  यांनी त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

“ग्रामविकास, जलसंधारण, पर्यावरण, लोकसहभाग, ग्रामसभा आदी क्षेत्रात आज आदर्श गाव हिवरे बाजारचा आदर्श घेऊन अनेक तरुण देशात कामाला लागले आहेत. राज्यात आदर्श गाव योजनेत सहभाग घेऊन त्यांनी आपले गाव आदर्श बनविले. देशभरातील हजारो तरुण सरपंच गाव आदर्श करण्यासाठी काम करत आहेत. त्यांच्या कामाला गती येईल. त्या गावांना प्रेरणा मिळेल. त्यांचा उत्साह वाढेल. खेड्यातील सहजीवनाच्या प्रेरणा अधिक बळकट होतील. महात्मा गांधी व यशवंतराव चव्हाण यांच्या स्वप्नातील गावांचा हा सन्मान आहे,” असे पवार म्हणाले.

पाण्याचा पॅटर्न हा राज्यात व देशात हिवरेबाजारचा असेल, असे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख व उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील यांनी जाहीर केले होते. हा पॅटर्न आता जगातील काही देशात गेला आहे. हिवरेबाजार पॅटर्नचा हा गौरव असल्याचे पवार म्हणाले.