नांदुरी येथील सप्तशृंग गड घाटात मंगळवारी मध्यरात्री एका वळणावरून जीप खोल दरीत कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार झाले, तर एक जण जखमी झाला. जीप दरीत कोसळणार याचा अंदाज आल्यावर चालकाने आधीच उडी मारल्याने तो बचावला. घाटातील कठडे मजबूत नसल्याने हा अपघात घडल्याची वाहनधारकांची प्रतिक्रिया आहे. काही वर्षांपूर्वी याच प्रकारे दरीत खासगी बस कोसळून ४० भाविकांचा मृत्यू झाला होता.
निवृत्तीनाथ यात्रेनंतर गडावर दर्शनासाठी भाविकांना घेऊन जीप गडावर गेली होती. तेथून परतताना हा अपघात घडला. तीन भाविकांना घेऊन निघालेली जीप घाटातील गणेश मंदिर वळणावर आली असता चालकाचे नियंत्रण सुटले आणि कठडे तोडून ती ३०० फूट खोल दरीत कोसळली.
या वेळी चालक राजेंद्र रहिराव आहेर याने उडी मारली. जीपमधील रामा पंडित ठाकरे (१७), अजय राजेंद्र ठाकरे (१५, दोघेही रा. नांदुरी) आणि गणेश गोऱ्हे (२४, वैजापूर) हे जागीच ठार झाले. चालक आहेर जखमी झाला.
चालक पहाटे शुध्दीत आल्यावर अपघाताचा प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर पोलीस व ग्रामस्थांनी धाव घेतली. दरम्यान, सप्तशृंग घाटातील निकृष्ट दर्जाचे कठडे अपघातास कारणीभूत ठरल्याचे वाहनधारकांचे म्हणणे आहे. काही वर्षांपूर्वी याच घाटात गडावरून खाली येणारी खासगी बस दरीत कोसळली होती.
संग्रहित लेख, दिनांक 30th Jan 2014 रोजी प्रकाशित
सप्तशृंग घाटात जीप कोसळून तीन ठार
नांदुरी येथील सप्तशृंग गड घाटात मंगळवारी मध्यरात्री एका वळणावरून जीप खोल दरीत कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार झाले,
First published on: 30-01-2014 at 12:41 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three killed aftre jeep collapse in nashik saptashrungi ghat