होळी व धुलिवंदनानिमित्त ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प १६ व १७ मार्चला बंद असल्याचे जाहीर केले खरे, परंतु १६ मार्च म्हणजे होळीच्या दिवशीचे ऑनलाईन बुकिंग पर्यटकांनी दोन महिन्यापूर्वीच करून ठेवले असल्याने नाईलाजास्तव सहाही प्रवेशव्दारातून पर्यटकांना प्रवेश देण्याची नामुश्की ताडोबा व्यवस्थापनावर ओढवली. सार्वजनिक सुटय़ांकडे दुर्लक्ष झाल्यामुळेच व्याघ्र प्रकल्पात प्रवेश द्यावा लागल्याची ओरड आता वन्यजीवप्रेमी करीत आहेत.
होळी व धुलिवंदनानिमित्त दरवर्षी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी बंद असतो. केवळ ताडोबाच नाही, तर राज्यातील मेळघाट, पेंच, सहय़ाद्री व्याघ्र प्रकल्पही सलग दोन दिवस बंद असतो. दरवर्षी ताडोबाची बुकिंग ही ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या उपवनसंरक्षकांच्या कार्यालयातून व्हायची, परंतु आता गेल्या वर्षीपासून ऑनलाईन बुकिंग पध्दत सुरू झालेली आहे. त्यामुळे जगाच्या पाठीवरील कोणत्याही गावातून ताडोबा प्रवेशाची ऑनलाईन बुकिंग करता येते. नेमका याच बाबीचा ताडोबा व्यवस्थापनाला विसर पडला आणि गोंधळ झाला.
होळी व धुलिवंदनाची सलग सुटी आल्याने अनेकांनी विकएंड असल्याचे बघून पर्यटनाचा बेत आखला. त्यानुसार बहुतांश पर्यटकांनी १६ मार्च म्हणजे होळीच्या दिवशीचे ताडोबाचे ऑनलाईन बुकिंगही करून ठेवले.
शनिवार, रविवार ताडोबा आणि धुलिवंदनाच्या दिवशी आपल्या गावाकडे परत जायचे, असा हा विकएंडचा कार्यक्रम होता. त्यानुसार १६ मार्चचे ताडोबाचे ऑनलाईन बुकिंग हाऊसफुल्ल झाले. याच वेळी ताडोबा व्यवस्थापनाला १६ व १७ मार्चला होळी आणि धुलिवंदनानिमित्त ताडोबा बंद राहत असल्याची आठवण झाली. त्यामुळे ताडोबा व्यवस्थापनाने १५ मार्चला जिल्हा माहिती कार्यालयाकडून तातडीने एक पत्रक पाठवून १६ व १७ मार्च रोजी ताडोबा बंद असल्याचे जाहीर केले. हे वृत्त बहुतांश वर्तम्ांानपत्रात प्रसिध्द झाले. दरम्यान, ते वृत्त १६ मार्चची ऑनलाईन बुकिंग असलेल्यांनी वाचले आणि ताडोबा क्षेत्र संचालक व उपवनसंरक्षकांच्या कार्यालयातील दूरध्वनी, भ्रमणध्वनी खणखणायला लागले. आम्ही ऑनलाईन बुकिंग केले आहे. केवळ प्रवेशाचेच नाही, तर हॉटेल, रिसोर्टही बुक केले आहे. आता ऐनवेळी १६ मार्चला व्याघ्र प्रकल्प कसा बंद ठेवता, अशी विचारणा सर्व पर्यटकांकडून होण्यास सुरुवात झाली.
एकीकडे बुकिंग हाऊसफुल्ल आणि दुसरीकडे व्यवस्थापनाने होळीनिमित्त प्रकल्प बंद ठेवलेला. त्यामुळे पर्यटक व अधिकाऱ्यांचा एकच गोंधळ उडाला. बंद ठेवायचेच होते तर मग दोन महिन्यापूर्वीच जाहीर करायचे होते, असे पर्यटकांनी अधिकाऱ्यांना सुनावले. त्यामुळे नाईलाजास्तव शेवटी रात्री उशिरा १६ मार्चला ताडोबा प्रकल्पाची सर्व सहाही दरवाजे उघडी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार रात्री उशिरा जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून ताडोबा व्याघ्र प्रकल्प १६ मार्चला सुरू असल्याचे पत्रक पाठविण्यात आले. त्यामुळे ताडोबाच्या अधिकाऱ्यांवर नामुष्की ओढवली आणि शेवटी आज सकाळ व दुपार अशा दोन्ही वेळात प्रकल्प सुरू होता.
दरम्यान, ताडोबा व्यवस्थापन आता तांत्रिक चुकीमुळे बुकिंग झाले असल्याचे सांगत असले तरी सुटय़ांचे नियोजन केले नसल्यामुळेच दोन महिन्यापूर्वी ताडोबाचे आगाऊ बुकिंग झालेले होते. त्यामुळेच शेवटी ताडोबा व्यवस्थापनाला पर्यटकांना ताडोबात प्रवेश द्यावा लागला.
संग्रहित लेख, दिनांक 17th Mar 2014 रोजी प्रकाशित
पर्यटकांना आजही प्रवेश देण्याची ताडोबा व्याघ्र प्रकल्पावर नामुष्की
होळी व धुलिवंदनानिमित्त ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प १६ व १७ मार्चला बंद असल्याचे जाहीर केले खरे, परंतु १६ मार्च म्हणजे होळीच्या दिवशीचे ऑनलाईन बुकिंग पर्यटकांनी दोन महिन्यापूर्वीच करून ठेवले
First published on: 17-03-2014 at 02:06 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tourist to tadoba tiger reserve