धाराशिव : पंचज्ञानेंद्रीयांना प्रफुल्लीत करणारा वाद्यांचा ठेका, कुंकवाची मनसोक्त उधळण, आई राजा उदो-उदोचा गगनभेदी जयजयकार करीत तुळजाभवानी मातेचे सीमोल्लंघन मंगळवारी मोठ्या भक्तीमय वातावरणात पार पडले. सीमोल्लंघनानंतर आता पौर्णिमेपर्यंत तुळजाभवानी देवीची श्रमनिद्रा असणार आहे. पौर्णिमेला सोलापूरच्या मानाच्या काठ्यांसह तुळजाभवानी मंदिरात पुन्हा आई राजा उदो-उदोचा पुन्हा उदोकार घुमणार आहे.

सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास नगरहून आलेला तुळजाभवानी देवीचा मानाचा पलंग शहरात दाखल झाला. तुळजापूर शहरातील पारंपारिक मार्गावरून पलंगाची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. अग्रभागी पोत घेतलेल्या महिला आराधी भाविकांचे लक्ष वेधून घेत होत्या. पहाटे साडेचार वाजण्याच्या दरम्यान पलंग पालखी तुळजाभवानी देवीच्या मंदिरात दाखल झाली. अभिषेकानंतर तुळजाभवानी देवीच्या मूर्तीला १०८ साड्यांचे दिंड बांधण्यात आले. त्यानंतर मोठ्या भक्तीमय वातावरणात धुपारती झाली. धुपारतीनंतर तुळजाभवानी देवीचे माहेर अशी ख्याती असलेल्या नगरहून आलेल्या मानाच्या पलंग पालखीत देवीची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. पिंपळाच्या पारावर पालखी टेकवल्यानंतर पारंपारिक प्रथेप्रमाणे तुळजाभवानीचा जयघोष करीत संबळाच्या निनादात सर्व विधी करण्यात आला.

हेही वाचा – मुंबईतील दसरा मेळाव्याला जात असताना अपघातात एक ठार, चार जखमी

मंदिरातील या सर्व धार्मिक कार्यक्रमास तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, मंदिर समितीचे विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, विश्वस्त तथा उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, तहसीलदार सोमनाथ माळी यांच्यासह तुळजाभवानी देवीचे महंत, उपाध्ये, भोपे, पाळीकर पुजारी मंडळाचे पदाधिकारी, सदस्य आणि भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा – “एखाद्या भावनेपोटी राजकारणातून निवृत्त होत असल्याचं सांगतो, पण…”, निलेश राणेंच्या निर्णयावर शिंदे गटाचं वक्तव्य

सीमोल्लंघनासाठी देवी भाविकांबरोबर

तुळजाभवानी देवीची मूर्ती चल मूर्ती आहे. आपले सिंहासन सोडून सीमोल्लंघन करण्यासाठी तुळजाभवानी देवी भाविकांच्या बरोबर गाभार्‍याच्या बाहेर येते. सीमोल्लंघनानंतर पुन्हा पौर्णिमेपर्यंत देवीची श्रमनिद्रा असते. देवीच्या मूर्तीला इजा होऊ नये म्हणून १०८ साड्या परिधान केल्या जातात. पलंग पालखीच्या मिरवणुकीनंतर प्रथेप्रमाणे पलंग तोडून पालखीचे होमात विसर्जन करण्यात आले. यावेळी उपस्थित असलेल्या हजारो भाविकांनी कुंकू आणि फुलांची उधळण करीत जगदंबेच्या नावाचा जल्लोष केला.