मुंबई : पश्चिम उपनगरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये चालणाऱ्या वैश्याव्यवसायाच्या रॅकेटचा दिंडोशी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी बिगबॉसमधील अभिनेत्री अमृता धनोआ आणि मॉडेल रिचा सिंग यांना अटक केली आहे. या दोघी मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करणाऱ्या अभिनेत्रींना जाळ्यात ओढून त्यांच्याकडून वैश्याव्यवसाय करून घेत होत्या.
गोरेगाव परिसरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये मॉडेल आणि अभिनेत्री वैश्याव्यवसायाचे रॅकेट चालवत असल्याची माहिती परिमंडळ १२ चे उपायुक्त डी. एस. स्वामी यांना मिळाली. या माहितीच्या आधारे दिंडोशी पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून अमृताशी संपर्क साधला. या ग्राहकाने दोन तरुणींची मागणी अमृताकडे केली. तसेच गोरेगाव भागातील ‘वेस्टीन’ या पंचतारांकीत हॉटेलमध्ये या मुलींना पाठवण्यास सांगितले. त्यानुसार पोलीस निरीक्षक बाळकृष्ण शिंदे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पवार यांच्या पथकाने हॉटेल परिसरात सापळा रचला.
या तरूणी हॉटेलमधील खोलीत दाखल होताच बनावट ग्राहकाने या पथकाला त्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी या तरुणींना ताब्यात घेत, त्यांची सुटका केली. तसेच अमृता आणि रिचा यांना अटक केली.
अमृता ही इंटरनेट आणि मोबाईलद्वारे ग्राहकांशी संपर्क साधत असे. त्याचबरोबर मॉडेलिंग क्षेत्रातील तरुणींना आमिष दाखवून जाळ्यात ओढत असे, असा आरोप आहे.