अहिल्यानगर: महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सावेडी उपनगर शाखेच्या वतीने नगरमध्ये उद्या गुरुवारी व परवा शुक्रवारी असे दोन दिवस राज्यस्तरीय युवा साहित्य व नाट्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाचे उद्घाटन उद्या, सकाळी ११ वा. न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाच्या सभागृहात पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते तर समारोप शुक्रवारी दुपारी ३.३० वा. उद्योग तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे.
संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. प्रशांत भालेराव यांनी ही माहिती दिली. दोन दिवसांच्या या संमेलनात ग्रंथदिंडी, ग्रंथ प्रदर्शन, कवी कट्टा, काव्यांजली, निमंत्रितांचे कवी संमेलन, परिसंवाद, मुलाखती, संगीत रजनी, एकांकिका, महाचर्चा, प्रकट मुलाखत असे कार्यक्रम होणार आहेत.
अधिक माहिती देताना सावेडी उपनगर शाखेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी सांगितले की, संमेलनाध्यक्ष अभिनेत्री गौरी देशपांडे आहेत, उद्या सकाळी ९ वा. ग्रंथ दिंडीत अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार आदी उपस्थित राहणार आहेत. १० वा. ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन, १०.१५ वा. ध्वजारोहण व कवी कट्ट्याचे उद्घाटन, काव्यंजली कार्यक्रम व ११ वा. उद्घाटनप्रसंगी आमदार संग्राम जगताप, साहित्य परिषदेचे विश्वस्त यशवंतराव गडाख, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, मनपा आयुक्त यशवंत डांगे आदी उपस्थित राहतील.
दुपारच्या सत्रात प्रसिद्ध वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांच्या उपस्थितीत कवी संमेलन, सायंकाळी ४ वा. समाज माध्यमे व नाट्यक्षेत्र या विषयावर परिसंवाद, सायंकाळी ५.३० वा. सामना चित्रपटाची ५० वर्षे व भारत कधी कधी माझा देश आहे या विषयावर रामदास फुटाणे यांची प्रकट मुलाखत, सायंकाळी संगीत रजनी.
दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी ९ वा. पुरुषोत्तम करंडक विजेत्या एकांकिकेचा प्रयोग, ११ वा. बदलती शिक्षण व्यवस्था आणि मराठी साहित्य या विषयावर चर्चा, दुपारी २ वा. आमचे प्रशासनातील अनुभव या विषयावर जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, माजी पोलीस महानिरीक्षक यांची मुलाखत व दुपारी ३ वा. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत समारोप होईल.
संमेलनाचे उद्घाटन उद्या, सकाळी ११ वा. न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाच्या सभागृहात पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते तर समारोप शुक्रवारी दुपारी ३.३० वा. उद्योग तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. दोन दिवसांच्या या संमेलनात ग्रंथदिंडी, ग्रंथ प्रदर्शन, कवी कट्टा, काव्यांजली, निमंत्रितांचे कवी संमेलन, परिसंवाद, मुलाखती, संगीत रजनी, एकांकिका, महाचर्चा, प्रकट मुलाखत असे कार्यक्रम होणार आहेत.