उत्तर प्रदेशातील बेकायदा धर्मांतर प्रकरणी दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) सोमवारी आणखी तिघांना अटक केली आहे. याआधी दोघांना अटक करण्यात आली आहे. एटीएसने सोमवारी मुफ्ती काझी जहांगीर कासमी आणि मोहम्मद उमर गौतम या दोघांना अटक केली होती. मूकबधिर मुलं आणि महिलांचं धर्मांतर केल्याच्या प्रकरणात त्यांचा सहभाग असून १ हजारांपेक्षा जास्त लोकांचं त्यांनी धर्मांतर केलं असल्याचं उत्तर प्रदेश पोलिसांनी सांगितलं आहे. दरम्यान या धर्मांतर प्रकरणात महाराष्ट्रातील बीडचं कनेक्शनही समोर आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उत्तर प्रदेश पोलिसांनी सोमवारी मन्नू यादव उर्फ अब्दुल, इरफान शेख आणि राहुल भोला यांना अटक केली आहे. यामधील इरफान शेख हा महाराष्ट्राच्या बीडमधील आहे. यामुळे धर्मांतर प्रकरणाचे धागेदोरे बीडपर्यंत पोहोचले आहेत. अतिरिक्त महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना पोलीस सध्या उपर गौतम याने आपल्या आयडीसी संस्थेमार्फत केलेल्या धर्मांतराची माहिती घेत असल्याचं म्हटलं आहे.

उत्तर प्रदेशात हजारो मुलं-महिलांचं धर्मांतर! ATS ने केला रॅकेटचा पर्दाफाश; दोघांना अटक

“धर्मांतर प्रकरणात एटीएसने अजून तिघांना अटक केली आहे. उमर गौतमने ज्या लोकांचं धर्मांतर केलं आहे त्यांची माहिती आम्ही मिळवत आहोत. कारवाई करण्यासाठी आम्ही ३२ जिल्ह्यांच्या पोलीस अधिक्षकांना पत्र पाठवलं आहे. यामध्ये प्रयागराज, बुलंदशहर, बिजनोर, कानपूर, मेरठ आणि मथुरा यांचा समावेश आहे. पुराव्यांच्या आधारे पुढील तपास केला जात आहे,” असं प्रशांत कुमार यांनी सांगितलं आहे.

“आरोपी उमर गौतम याने परदेशातून पैसे मिळवताना आपलं खासगी तसंच कुटुंबाच्या बँक खात्याचा वापर केला आहे. हे स्पष्टपणे परदेशी चलन नियमन कायद्याचं उल्लंघन आहे,” अशी माहिती प्रशांत कुमार यांनी दिली आहे.
“फातिमा चॅरिटेबल ट्रस्टमधील पैसे आरोपी उमर गौतमने वैयक्तिक वापरासाठी कुटुंबाच्या बँक खात्यावर जमा केले होते. या ट्र्स्टचं ऑडिट करण्यात आले नसून आयकरदेखील भरण्यात आलेला नाही,” असं प्रशांत कुमार यांनी सांगितलं आहे.

काय आहे प्रकरण

उत्तर प्रदेश पोलिसांच्या एटीएसने सोमवारी मुफ्ती काझी जहांगीर कासमी आणि मोहम्मद उमर गौतम या दोघांना अटक केली. बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. मुफ्ती काझी जहांगीर कासमी आणि मोहम्मद उमर गौतम हे दोघे दक्षिण दिल्लीतील जामिया नगर भागात राहत होते. मूकबधिर मुलं आणि महिलांचं धर्मांतर केल्यांच्या घटनांमध्ये त्यांचा सहभाग असून १ हजारांपेक्षा जास्त लोकांचं त्यांनी धर्मांतर केलं असल्याचं उत्तर प्रदेश पोलिसांनी सांगितलं आहे. तपासादरम्यान आरोपींना पाकिस्तानमधील आयएसआय तसंच इतर परदेशा संस्थांकडून पैसा पुरवला जात असल्याचं स्पष्ट झालं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Up forced conversion case irfan sheikh from beed arrested sgy