मराठा आरक्षण, कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी आणि अॅट्रॉसिटी कायद्यात बदल या प्रमुख मागण्यासांठी सध्या राज्यभरात काढण्यात येत असलेल्या मराठा मोर्च्यांचा सूर टिपेला पोहचला आहे. या मोर्च्यांमुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंप होण्याची शक्यता असताना आता गावपातळीवर याचे पडसाद उमटण्यास सुरूवात झाली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दर्शविण्यासाठी साताऱ्याच्या खटाव तालुक्यातील गुंडेवाडी या गावाने ग्रामसभेत ठराव मांडून गावाचे नावच बदलले आहे. ग्रामसभेत मंजुर झालेल्या ठरावानुसार गुंडेवाडीचे नाव मराठानगर असे करण्यात आले आहे.
गुंडेवाडी हे गाव खटाव तालुक्यात आहे. या गावाची लोकसंख्या १४०० इतकी असून गावात राहणारे बहुतांश लोक मराठा समाजातील आहे. काल सरपंच पूनम निकम यांच्या अध्यक्षतेखाली गुंडेवाडीची ग्रामसभा झाली. त्यावेळी पांडुरंग निकम यांनी गावचे नाव बदलून मराठानगर असे करण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला ग्रामसभेतील इतर सदस्यांनी अनुमोदन दिले आणि त्यानंतर हा प्रस्ताव एकमुखाने संमती देण्यात आली.
काल २ ऑक्टोबरच्या गांधी जयंतीनिमित्त राज्यातील २२ ते २५ हजार गावांमध्ये झालेल्या अनेक ग्रामसभांमध्ये मराठा आरक्षणाचे ठराव करण्यात आले. यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करावी, कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी द्यावी, शेतीला हमीभाव मिळण्यासाठी स्वाभिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, अरबी समुद्रातील शिवस्मारक तातडीने पूर्ण करावे असे ठराव करण्यात आले. मात्र, विदर्भातील दोन-तीन जिल्हे वगळता राज्यातील जवळ जवळ सर्व गावांच्या ग्रामसभांत मराठा क्रांती मोर्चातील मागण्यांच्या अनुषंगाने ठराव करण्यात आले. मराठवाड्यातील सुमारे ९० टक्के ग्रामपंचायतींनी ग्रामसभांचे आयोजन करून अशा प्रकारचे ठराव केले. अशाप्रकारच्या ठरावांमुळे आगामी काळात मराठा आरक्षणाची मागणी जोर पकडण्याची शक्यता आहे.