धवल कुलकर्णी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

करोनाची दहशत देशभरात, जगभरात पसरली आहे. अशात एक शब्द समोर येतो आहे ज्याचं नाव आहे सोशल डिस्टसिंग. पण असाच एक सोशल डिस्टन्सिंगचा प्रयत्न एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला एका इंग्रज अधिकाऱ्याने पुणेकरांचा प्लेगपासून बचाव करण्यासाठी केला होता. यादरम्यान करण्यात आलेल्या काही कठोर अशा उपाययोजनांमुळे शेवटी या अधिकार्‍याची हत्या काही क्रांतिकारकांनी केली होती.

या अधिकाऱ्याचे नाव होते वॉल्टर चार्ल्स रँड आणि त्याची हत्या क्रांतिकारक चाफेकर बंधू नी २२ जून १८९७ रोजी केली होती. याबाबत माहिती देताना निवृत्त पोलीस अधिकारी आणि महाराष्ट्र पोलीस खात्याचे एक इतिहासकार रोहिदास दुसार यांनी सांगितले की सनदी अधिकारी असलेले रँड यांनी १८९६ मध्ये पसरलेल्या प्लेगचा मुकाबला करण्यासाठी अशाच सोशल डिस्टन्स सिंगच्या उपाय योजना केल्या होत्या.

दुसार म्हणाले रँड हे लेक कमिशनर होते आणि त्यांचे कार्यक्षेत्र हे बॉम्बे प्रेसिडेन्सी होते. ही प्रेसिडेन्सी सध्या पाकिस्तानात असलेल्या सिंध प्रांतापासून ते कारवारच्या दक्षिणेला असलेल्या होनावर नदीपर्यंत इतक्या विस्तीर्ण भूभागावर पसरली होती. ते पुण्यामध्ये बसून प्लेग विरोधी उपाययोजनांचे संचालन करत.

रँड यांच्या अधिपत्याखाली ब्रिटिश आणि एतद्देशीय अधिकारी लोकांना सतत सांगत तुम्ही आपापली घरं सोडून शहराच्या बाहेर असते त्या मोकळ्या आणि उघड्या जागेवर स्थलांतर करा.पण लोक तसे करायला आणि त्या काळातील सोशल डिस्टन्स पाळायला तयार होत नसत. ते एक तर घरामध्ये लपून बसायचे किंवा देवळांमध्ये. प्लेग हा आजार उंदरांमुळे पसरत असल्यामुळे त्यांच्या विरोधात उपाययोजना करण्यात या गोष्टीमुळे बाधा येत.

दुसार म्हणाले की करोना ची साथ येते हे लक्षात आल्यानंतर अनेक मंदिरांनी आणि प्रार्थनास्थळांनी भाविकांसाठी दरवाजे बंद केले. पण प्लेगची साथ आली होती त्यावेळेला लोक मंदिरांमध्ये जाऊन लपून बसत किंवा देवाचा धावा करत. त्यावेळेला अधिकारी लोकांना पकडून लस घ्यायला उद्युक्त करायचे.

प्लेगच्या गाठी काखेत येत असल्यामुळे पोलीस आणि आणि सरकारी अधिकारी स्त्रिया आणि पुरुष दोघांचाही काखा कपडे काढून बळजबरीने तपासत असत. हे अधिकारी बऱ्याचदा पायातील बूट आणि पादत्राणे न काढताच लोकांना हुसकावून लावायला देवळांमध्ये आणि घरांमध्ये तसेच घुसत. गोऱ्या अधिकाऱ्यांच्या आणि सोजिरांच्या या आणि अशा अनेक कठोर उपाय योजना लोकांना जाचक वाटत आणि त्या मुळे त्यांच्या मनामध्ये असंतोष दाटत गेला.

शेवटी दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव या तीन चाफेकर बंधूंनी जून १८९७ मध्ये पुण्यातल्या गणेश खिंडीमध्ये रँड आणि त्याच्या सोबत असलेले लष्करी लेफ्टनंट यांच्यावर गोळ्या झाडल्या. रँड यांचा मृत्यू तीन जुलै रोजी झाला.

शेवटी या तिघा क्रांतिकारक बंधूंना अटक होऊन कालांतराने त्यांना फाशी सुद्धा देण्यात आली. त्याकाळात अनेक जहाल मताचे लोक आणि क्रांतिकारक सुद्धा लोकमान्य टिळकांना आपले स्फूर्तीस्थान मानत.  चाफेकर यांना लोकमान्य टिळकांनी मदत केली असाही संशय इंग्रज सरकारला होता.

याचा तपास करण्यासाठी खास अशा एका पोलिस अधिकाऱ्याला म्हणजे जन्माने अँग्लो-इंडियन असलेल्या इन्स्पेक्टर हॅरी ब्रुईन ला इंग्रजांनी पुण्याला पाठवले. ब्रूईन हे त्या काळातले एक नावाजलेले डिटेक्टिव होते असे दुसार म्हणाले.

टिळकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करेल असा कुठलाही पुरावा या अधिकाऱ्याला मिळाला नाही ही पण त्याने केलेला तपास लक्षात घेता इंग्रज सरकारने त्याला प्रमोशन देऊन थेट जिल्हा पोलीस सुपरिंटेंडेंट केले. सुरतचे पोलीस सुपरिंटेंडेंट असताना ब्रुईनचे निधन १९०५ मध्ये झाले. त्यावेळेला स्वतः लोकमान्य टिळकांनी केसरीमधून या अधिकाऱ्याच्या बाबत गौरवोद्गार काढले होते अशी आठवण सुद्धा त्यांनी सांगितली.

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Walter charles rand who brought social distancing in 1896 because of plague dhk