धाराशिव : आर्थिक फसवणुकीमुळे गळफास घेवून आत्महत्या केलेल्या दिवंगत दिलीप ढवळे यांच्या कुटुंबीयांना वार्‍यावर सोडणार नाही, असे मागील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आपण जाहीर केले. पीडित ढवळे कुटुंबीयांना आजवर न्याय का दिला नाही? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव तथा प्रवक्ते अविनाश आदिक यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला आहे. ठाकरे आज (शनिवारी) महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ धाराशिव येथे सभा घेणार आहेत. त्यामुळे या प्रश्नाला उद्धव ठाकरे काय उत्तर देणार? याची उत्सुकता सामान्य मतदारांना लागली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

येथील पुष्पक पार्क हॉटेलच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत आदिक यांनी उद्धव ठाकरेंसमोर पाच प्रश्न उपस्थित केले आहेत. यावेळी शिक्षक आमदार विक्रम काळे आणि भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांचीही उपस्थिती होती. आदिक यांनी या पत्रकार परिषदेत, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि तुमचे स्वतःचे आराध्यदैवत असलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी रेल्वेमार्ग यावा, तुळजापूर तीर्थक्षेत्र रेल्वेच्या नकाशावर यावे यासाठी मुख्यमंत्री असताना राज्याच्या वाट्याचे ४५२ कोटी रुपये का दिले नाहीत? असा पहिला सवाल उपस्थित केला. त्यानंतर त्यांनी मराठवाडा आणि धाराशिव जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी सर्वात महत्वपूर्ण प्रकल्प असलेला ७ टीएमसी पाण्याचा कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प लवकर मार्गी लागावा यासाठी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कालावधीत भरीव निधी का उपलब्ध करून देण्यात आला नाही? कौडगाव येथील अद्योगिक वसाहतीत प्रस्तावित असलेल्या दहा हजार रोजगार क्षमता असलेल्या तांत्रिक वस्त्रोद्योग प्रकल्पाबाबत आपल्या अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कालावधीत अनेकदा लेखी स्वरूपात पाठपुरावा करूनही साधी एकही बैठक आपली का लावली नाही? उमेदवार असलेल्या तुमच्या खासदाराने केलेल्या आर्थिक फसवणुकीमुळे गळफास घेऊन स्वतःचे जीवन संपवलेल्या दिलीप ढवळे यांना शिवसैनिक असून देखील मातोश्रीचे दरवाजे का बंद होते? २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ढवळे आत्महत्या प्रकरणी आरोपी असलेल्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आले असताना ढवळे कुटुंबीयांना वार्‍यावर सोडणार नाही, त्यांना न्याय मिळवून देणारच, असे आपण जाहीर केले होते. ढवळे कुटुंबीयांना अद्यापपर्यंत न्याय का मिळवून दिला नाही? ढवळे प्रकरणाशी साधर्म्य असलेल्या अन्वय नाईक प्रकरणी मुख्यमंत्री म्हणून आपण ज्या तडकाफडकी कारवाई केली. अगदी तशीच कारवाई शिवसैनिक असलेल्या ढवळे आणि त्यांच्या सोबत असलेल्या इतर ७२ शेतकर्‍यांची आर्थिक फसवणूक प्रकरणात आरोपी असलेले तुमचे उमेदवार तथा खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यावर का कारवाई केली नाही? असे एकापाठोपाठ पाच सवाल उपस्थित केले.

हेही वाचा – “एका अब्जाधीश गोल्ड माफियाला…”, खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अविनाश जाधवांचा मोठा दावा; म्हणाले…

हेही वाचा – सावधान! निवडणुकीदरम्यान ‘डीप फेक’ व्हिडीओ शेअर कराल, तर होईल कारवाई; राज्य सरकारचे निर्देश

या प्रश्नांची उत्तरे उद्धव ठाकरेंनी आपल्या जाहीर सभेतून द्यावीत, असे आव्हान आदिक यांनी ठाकरेंना दिले आहे. यावेळी त्यांनी महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना मतदारांनी मोठे मताधिक्य देवून विजयी करावे, असे आवाहन केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why justice was not given to the victim dhawale family ncp question to uddhav thackeray ssb