काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे कनिष्ठ पुत्र धीरज युवक काँग्रेसच्या माध्यमातून सक्रिय झाले आहेत. युवक काँग्रेस सदस्य नोंदणीच्या जिल्ह्य़ातील विविध कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली. राजकारणात पडद्यामागे धीरज यांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. पहिल्यांदाच त्यांनी जिल्ह्य़ातील जाहीर कार्यक्रमांना हजेरी लावली.
धीरज यांचे शिक्षण एमबीएपर्यंत झाले आहे. त्यांचे ज्येष्ठ बंधू आमदार अमित राजकारणात सक्रिय झाल्यानंतर पडद्याआडून धीरज बरीच कामे पाहत असत. जिल्हय़ातील रेणापूर, शिरूर ताजबंद, अहमदपूर आदी भागात धीरज यांनी युवक काँग्रेस सदस्य नोंदणीत सहभाग नोंदविला. जळकोट व लातूर लोकसभा मतदारसंघातील नांदेड जिल्हय़ातल्या लोहा, कंधार तालुक्यांतही ते सदस्य नोंदणीस जाणार आहेत. विलासरावांचे दोन्ही पुत्र राजकारणात सक्रिय झाल्याने लातूरच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. अन्य जिल्ह्य़ांतही त्यांनी संपर्क वाढविण्याचे ठरविले आहे. येत्या काही दिवसांत नांदेड जिल्ह्य़ातही धीरज देशमुख बैठका घेणार आहेत.