देशात करोनाचा कहर सुरु आहे. दिवसभरात हजारो लाखो जणांना करोनाची लागण होत आहे. अनेक लोक बरेही होत आहेत. अभिनेता अर्जुन रामपाललाही करोनाची लागण झाली होती. मात्र, चारच दिवसांत त्याची करोना चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती मिळत आहे. त्याने सोशल मीडियावरुन ही माहिती दिली आहे

अर्जुनने आपला एक सेल्फी इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. याच्या कॅप्शनमधून तो लोकांना करोना प्रतिबंधक लस घ्यायचं आवाहनही करत आहे. यात तो म्हणतो, “जे त्रासातून जात आहेत त्यांच्यासाठी आणि त्यांच्या परिवारासाठी मी प्रार्थना करत आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो की माझ्या दोन करोना चाचण्या केल्या, त्या दोन्ही निगेटिव्ह आल्या आहेत. माझ्या डॉक्टरांनी मला या मागचं एक महत्त्वाचं कारण आहे”.

“मी लवकर बरा झालो कारण मी करोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यामुळेच मला जास्त त्रास झाला नाही आणि काही लक्षणंही नव्हती. मी सर्वांना लवकरात लवकर लस घेण्याची आणि सर्व प्रकारची खबरदारी घेण्याची विनंती करत आहे. तुम्हा सर्वांच्या प्रेमाबद्दल आणि काळजीबद्दल धन्यवाद. सकारात्मक राहा. हा वेळही निघून जाईल”.

१८ एप्रिल रोजी अर्जुनने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला करोनाची लागण झाल्याचं जाहीर केलं होतं. तसंच त्याला करोनाची कुठलीही लक्षणं दिसत नाहीत असंही तो म्हणाला होता. तो गृहविलगीकरणात होता. या काळातले वेगवेगळे फोटोजही तो आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत होता.

केंद्र सरकारने आता १८ वर्षांवरील सर्व नागरिकांच्या लसीकरणाला मान्यता दिली आहे.