|| सुहास जोशी

टीन एजर्सभोवती गुंफलेले कथानक हा विषय लोकप्रिय आणि प्रसिद्धी मिळवून देणारा असला तरी त्याचे सादरीकरण हे खूप महत्त्वाचे असते. ते कर्कश होऊन उपयोगाचे नसते. पौगंडावस्थेतील मुलांचे विषय, त्यातून निर्माण होणारी अडनिडी परिस्थिती, त्यातच कधीकधी येणारे गंभीर अनावस्था प्रसंग असे सारे काही या सिरिजमध्ये आहे. ‘थर्टीन रिझन्स व्हाय’ या वेब सिरिजमध्ये आपल्याला तेरा कारणे पाहायची आहेत. पण ही तेरा कारणे सलग न मांडता त्याला भूत आणि वर्तमानामध्ये बेमालूमपणे गुंफत नेले आहे. त्यामुळे केवळ द्वेषारोप न होता त्याला एक चांगली लय मिळते आणि ते पाहणे सुसंगत होत जाते.

ही गोष्ट आहे हॅना बेकर या अमेरिकी हायस्कूल विद्यार्थिनीची. त्यांचे हायस्कूल म्हणजे आपल्याकडील कनिष्ठ महाविद्यालय. हॅना ही दुसऱ्या एका शहरातून आलेली मुलगी. तिला ना कोणी मित्र ना मैत्रिणी. काहीशी बुजणारी, आपल्यातच रमणारी अशी ही मुलगी. त्याच वेळी अर्धवेळ नोकरीच्या ठिकाणी तिची ओळख होते ती तिच्याच वर्गातील क्ले जेन्सनबरोबर. दोघेही तसे फारसे घोळक्यात न मिसळणारे. पुढे हॅनाला काही मित्रमैत्रीण मिळतात. पौगंडावस्थेतील वयानुसारच तिची मानसिकता असते. अनेक गोष्टींचा अनुभव घ्यावा, हिंडावे, फिरावे, शाळेतील कार्यक्रमांत सहभागी व्हावी असा तिचा स्वभाव, पण त्याला काहीशा बुजरेपणाची आणि एकटेपणाची देखील जोड असते. आणि एकेदिवशी हॅना आत्महत्या करते. ना त्याबद्दल ती काही लिहून ठेवते ना त्याबद्दल ती कोणाशी बोललेली असते. पहिल्या भागाची सुरुवातच या ठिकाणी होते. तिच्या आत्महत्येनंतर १५ दिवसांनी जेन्सेनला घराबाहेर एक बॉक्स मिळतो. ज्यामध्ये नंबर टाकलेल्या सात ऑडीओ कॅसेट असतात. जेन्सन वडिलांच्या जुन्या टेपरेकॉर्डवर त्यातील पहिली कॅसेट ऐकायला घेतो तर त्याला हॅनाचा आवाज ऐकू येतो. हॅनाने आत्महत्या का केली हे सांगणाऱ्या तेरा कारणांचे वर्णन त्या कॅसेटमध्ये असते. जेन्सनकडे त्या कॅसेट का येतात, तर हॅनाने तिच्या आत्महत्येला जबाबदार अशा सर्व लोकांबरोबर झालेल्या घडामोडींचे वर्णन त्यात असते. त्या कॅसेट एकाने पूर्ण ऐकल्यावर पुढच्या व्यक्तीला द्यायच्या असतात. ही साखळी जर खंडित झाली तर त्या कॅसेट जगासाठी खुल्या होतील असे हॅनाने सांगितलेले असते. आणि साखळी खंडित होऊ  नये हे पाहण्याचे काम या सर्व मित्रांपैकी टोनी याच्यावर सोपवलेले असते. जेन्सन या साखळीतील शेवटचा असतो.

या वेबसिरिजचा संपूर्ण पहिला सीझन हा या तेरा कारण काय आहेत याचे वर्णन करणारा आहे. त्यातून हॅनाचा सारा प्रवास तर उलगडतो. त्याचबरोबर या कॅसेट ऐकताना त्या हायस्कूलमधील इतर घडामोडींदेखील आपण पाहत असतो. हॅनाच्या आत्महत्येचे कारण न कळल्यामुळे तिची आई प्रचंड अस्वस्थ असते. त्यातच तिला हॅनाच्या शाळेच्या लॉकरमध्ये हॅनावर शेरेबाजी केलेला कागद आढळतो, शाळेतील मुलींच्या स्वच्छतागृहात लिहिलेले असंख्य मजकूर ती पाहते. आणि आपल्या मुलीला शाळेमध्ये असताना गटबाजीला, दमदाटीला सामोरे जावे लागल्याचा आरोप करत शाळेवर कायदेशीर खटला दाखल करते.

ही वेबसिरिज जरी पौगंडावस्थेतील मुलांचे प्रश्न मांडणारी असली तरी तिचा प्रभाव प्रेक्षकांवर पडतो त्याला हा विषय इतपतच कारण नसून दिग्दर्शन, चित्रीकरण, संवाद, संकलन, मांडणी अशा सर्वच घटकांचा खूप मोठा हातभार आहे. कथेचा मुख्य भाग हा सारा भूतकाळातील आहे. पण भूतकाळातील प्रसंग आणि वर्तमानकाळातील प्रसंग हे अगदी एकमेकाला जोडून येतात. भूतकाळात हॅना एखादा दरवाजा उघडून बाहेर जातानाचे दृश्य असेल तर दुसऱ्या क्षणाला गोष्ट वर्तमानात येते आणि त्या दरवाजाबाहेर वर्तमानातील पात्र उभे असते. ठिकाण तेच असते, पण गोष्टीला भूतकाळातून वर्तमानात आणण्यासाठी ही कल्पना खूप प्रभावी ठरते. कारण या कॅसेट जेन्सनच्या आधी ऐकणाऱ्यावर फारसा परिणाम झालेला नसतो. पण जेव्हा जेन्सन ते ऐकू लागतो तेव्हा त्याच्यासाठी अनेक घटना नवीन असतात. त्याचा त्याला धक्का बसत असतो आणि तो त्या प्रत्येक घटनेचा वर्तमानात मागोवा घ्यायला धडपडत असतो. हॅनाचे प्रश्न तो स्वत:लाच विचारायला लागलेला असतो. भूतकाळातील हॅनाच्या डोक्यातील गोंधळ, घुसमट आणि वर्तमानातील जेन्सनच्या डोक्यातील मनोवैज्ञानिक गोंधळ असा हा सारा पट दिग्दर्शकाने यामध्ये मांडला आहे.

हे सारे कथानक सस्पेन्स किंवा थ्रिलर या वर्गवारीत न बसणारे आहे. कारण एकतर ते अनेकांना माहीत आहे. त्यात कोण कोण सहभागी आहे हे एकेक करून उलगडले जात असते. नेमका एकच कोणीतरी असता तर कदाचित याची गणना सस्पेन्समध्ये केली असती. पण येथे प्रश्न असतो अजून कोण आणि का? या का चे उत्तर हॅना देत असते.

एकूण कथानक पकड घेणारे असले तरी त्यात काही ठळक गोष्टींचा उलगडा होत नाही. हॅनाची मानसिकता पुरेशी न उलगडली जात नाही. तिच्या जगण्यातील हा भाग त्याला नेमका सापडलेला नाही. मात्र संपूर्ण मालिकेच्या दृष्टीने विचार करता एकंदरीत प्रभावीपणा जाणवतो. त्यामुळे प्रत्येक भागागणिक एक अस्वस्थपणा जाणवत राहतो. जाता जाता या माध्यमातून त्याने अमेरिकन जीवनशैली आणि कुटुंबव्यवस्थेचे एक पुसटसे का होईना; पण चित्र उभं करायचा प्रयत्न केला आहे, हे निश्चित.

  • १३ रिझन्स व्हाय
  • ऑनलाइन अ‍ॅप – नेटफ्लिक्स
  • सीझन पहिला