सध्याच्या गतिमान काळात कौटुंबिक मूल्यांचा ऱ्हास होत चालला असताना या पार्श्वभूमीवर ‘आजी’ हा कुटुंबप्रधान सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आजी आणि नातवाचं नातं दुधावरच्या सायीसारखं असतं. आजी आणि नातवाच्या नात्याची हीच प्रेमळ गोष्ट ‘आजी’ या सिनेमातून पाहता येणार आहे. दोन पिढ्यांमध्ये वैचारिक संघर्ष हा असतोच. हाच संघर्ष केंद्रस्थानी ठेवून या चित्रपटाची कथा गुंफण्यात आली आहे. वडील आणि मुलाच्या नात्यातील संघर्षात आजी आणि मामा कशाप्रकारे समन्वयाची भूमिका पार पाडतात आणि ढासळणारे नात्याचे बंध परत जुळतात याचे भावनिक चित्रण या चित्रपटात पहायला मिळणार आहे. ए. बी कॉर्पोरेशन प्रस्तुत पूजा तोंडवळकर निर्मित दुर्गेश सुखटणकर दिग्दर्शित ‘आजी’ चित्रपटात रेखा कामत, राजन भिसे, उदय टिकेकर, अनिकेत विश्वासराव, हिंदी अभिनेता महेश ठाकूर, तन्वी मालपेकर यांच्या भूमिका आहेत.
नुकतंच वीर सावरकर सभागृहात या चित्रपटातील काही भाग चित्रित करण्यात आला. या चित्रपटाचं लेखन चिन्मय मांडलेकर यांनी केलं असून दिग्दर्शक दुर्गेश सुखटणकर यांचा हा पहिलाच सिनेमा आहे. या कथेची शॉर्टफिल्म आधी करण्यात आली होती. तिला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादानंतर यावर चित्रपट बनवण्याची तयारी करण्यात आली. सोनू निगम, शान, नेहा राजपाल यांनी स्वरबद्ध केलेल्या गाण्यांना अशोक पत्की, निलेश मोहरिर आणि आशुतोष यांनी संगीताचा साज चढवला आहे. नात्याचे वेगवेगळे पदर यात उलगडण्यात आले आहेत. आपल्या अवतीभवती घडणारी ही कथा असल्यामुळे प्रत्येकाला ती जवळची वाटेल असा विश्वास कलाकारांनी यावेळी व्यक्त केला.
संग्रहित लेख, दिनांक 5th Jul 2014 रोजी प्रकाशित
नात्यांची गंमत उलगडणारी ‘आजी’
सध्याच्या गतिमान काळात कौटुंबिक मूल्यांचा ऱ्हास होत चालला असताना या पार्श्वभूमीवर 'आजी' हा कुटुंबप्रधान सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

First published on: 05-07-2014 at 04:39 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aaji marathi movie