तुम्हाला आमिरचा ‘३ इडियट्स’ हा सिनेमा आठवतोय का? या सिनेमात तो एका अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या भूमिकेत होता. या सिनेमाने बॉक्स आॉफिसवर इतिहास रचला होता. पण आमिरची ही एक गोष्ट फार कमी जणांना माहित आहे की त्याच्या कुटुंबियांना तो अभिनेता व्हावा असे कधीच वाटत नव्हते. याउलट त्याने अभियांत्रिकेचे शिक्षण घ्यावे असेच वाटत होते. दिग्दर्शक ताहिर हुसैन यांचा मुलगा आणि निर्माता नासिर हुसैन यांचा पुतण्या आमिरने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही खुलासे केले आहेत. बॉलिवूडमध्ये काम मिळालं तर मिळतं नाही तर नाही. त्यामुळे अशा अस्थिर व्यवसायात त्याने येऊ नये अशीच त्याच्या कुटुंबियांची इच्छा होती. आमिर म्हणाला की, सगळ्यांनाच असं वाटत होतं की मी चित्रपटसृष्टीमध्ये जाऊ नये. बाकीचे सोडाच पण माझ्या घरातल्यांनाही असेच वाटत होते.

आमिर म्हणाला की, आई, बाबा आणि काकांना या क्षेत्रातील कामातली अनिश्चितता पाहून ते मला या क्षेत्रात जाऊ देण्यास मान्यताच देत नव्हते. मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या १८ व्या आंतरराष्ट्रीय मामि चित्रपट महोत्सवामध्ये ५१ वर्षीय आमिर बोलत होता. माझ्या कुटुंबियांनी ज्या क्षेत्रात स्थिरता आहे अशा ठिकाणी नोकरी करण्याचा सल्ला दिला होता. बॉलिवूडमध्ये एका मिनिटापूर्वी काम असतं तर दुसऱ्या मिनिटांला ते काम हातून निघूनही जातं. मी आयुष्यात थोडं स्थिरस्थावर व्हावं असं त्यांना वाटत होतं. मी अभियांत्रिक, डॉक्टर किंवा सीए व्हावं असं घरच्यांना वाटत होतं.

दरम्यान, नुकताच आमिरचा आगामी सिनेमा दंगलचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा नाताळमध्ये प्रदर्शित होणार आहे. सिनेमाचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांची या सिनेमाबद्दलची उत्सुकता अजून वाढली आहे. या सिनेमाचे पोस्टर फार आधीच प्रदर्शित करण्यात आले होते. या पोस्टरमध्ये भारदस्त व्यक्तिमत्त्वाचा आमिर त्याच्या चार मुलींसोबत बसलेला दिसतो. पोस्टरच्या वरती हरयाणवी भाषेत, म्हारी छोरियां छोरों से कम हैं के? असे लिहिले आहे.