टेलिव्हिजन अभिनेत्री आणि ‘नागिन’ फेम आश्का गोरडिया लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. ब्रेंट गोबलेसोबत नुकताच तिचा साखरपुडा झाला असून याचे काही फोटो मौनी रॉयने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. आश्काने ब्रेंटसोबत ‘नज बलिये’ या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. लग्नाची तारीखही निश्चित झाली असून ३ डिसेंबर रोजी दोघे विवाहबद्ध होणार आहेत. आश्काच्या गावी अहमदाबादमध्ये हा लग्नसोहळा पार पडणार आहे.
खरंतर आश्का आणि ब्रेंट दुसऱ्यांदा साखरपुडा करत आहेत. मागच्या वर्षी न्यूयॉर्कमध्ये ब्रेंटच्या घरी ख्रिश्चन पद्धतीने दोघांचा साखरपुडा झाला होता. आता आश्काच्या नातेवाईकांच्या आणि मित्रमैत्रिणींच्या आग्रहाखातर दोघांनी मुंबईत पारंपरिक पद्धतीने पुन्हा एकदा साखरपुडा केला. आश्काच्या ओशिवरा येथील घरी जवळचे नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत हा साखरपुडा पार पडला. कार्यक्रमात पारंपरिक वेशभूषेत ब्रेंटने सर्वांचंच लक्ष वेधलं. यावेळी तिची जिवलग मैत्रीण मौनी रॉयसुद्धा उपस्थित होती. मौनीसोबतच जूही परमार, सना खानदेखील साखरपुड्याला उपस्थित होते.
लग्नाची तारीख जाहीर करतानाच आश्का एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली की, ‘ब्रेंटला पारंपरिक पद्धतीने लग्न करायचं होतं आणि हे फक्त माझ्या गावी अहमदाबादमध्येच शक्य होईल असं वाटलं. अहमदाबादमध्ये लग्न करायचं आणखी एक कारण म्हणजे त्या शहराशी निगडीत माझ्या अनेक आठवणी आहेत. १६ वर्ष मी तिथे राहिली. माझ्या सासरच्या मंडळींना पारंपरिक गरबा, गुजराती जेवळ आणि पाहुणाचार आवडेल असा मला विश्वास आहे.’
[jwplayer 3f7j4vRn]