नवरात्र असल्यामुळे सध्या सगळीकडे प्रसन्न आणि उत्साहाचं वातावरण आहे. अनेकांच्या घरी देवीची स्थापना झाली आहे. त्यामुळे प्रत्येक जण भावपूर्ण श्रद्धेने देवीची उपासना करत आहेत. मात्र, लॉकडाउन असल्यामुळे दरवर्षीप्रमाणे गरबा, रासदांडी यांचं आयोजन करण्यात आलेलं नाही. त्यामुळे तरुणाईमध्ये आणि सेलिब्रिटींमध्ये थोडीशी नाराजी दिसत आहे. परंतु, काही सेलिब्रिटी असेदेखील आहेत जे घरच्या घरीदेखील गरबा खेळून या नवरात्रोत्सवाचा आनंद साजरा करत आहेत.

अभिनेता जय भानुशाली याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो पत्नी माही विज हिच्यासोबत गरबा खेळताना दिसत आहे. विशेष म्हणजे लॉकडाउन जरी असला तरी आनंद साजरा करण्यासाठी कोणतंही बंधन नसतं हे त्यांच्या या व्हिडीओवरुन दिसत आहे. तसंच त्याने त्याच्या कुटुंबाचा फोटोदेखील शेअर केला आहे. यात त्याची लहान मुलगी तारादेखील घागराचोलीमध्ये दिसत आहे.

दरम्यान, जय आणि माही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रीय असून ते अनेकदा त्यांच्या जीवनातील लहान लहान गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतात. यामध्ये ते अनेक वेळा त्यांच्या मुलीचे व्हिडीओ किंवा फोटो शेअर करत असतात.