बॉलिवूडमध्ये वादग्रस्त विधानाने चर्चेत असणाऱ्या राखी सावंतने चित्रपट निर्मात्यांना जम्मू-काश्मीरमध्ये चित्रीकरण करण्याचे आवाहन केले आहे. बॉलिवूड आणि दाक्षिणात्याच नव्हे तर इतर क्षेत्रातील निर्मात्यांनी जम्मू काश्मीरमध्ये येऊन चित्रपटाचे चित्रीकरण करावे, असे ती म्हणाली आहे. वृत्तवाहिनीवर आपल्याला दिसणारी जम्मू काश्मीरची स्थिती खरी नाही, त्यामुळे या सुंदर परिसरात चित्रीकरण करुन पर्यटकांना प्रोत्साहन द्यावे, असे राखीने म्हटले आहे. राखी सावंत तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सध्या जम्मू- काश्मीरमध्ये आहे. शनिवारी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये राखीने काश्मीरच्या वेगवेगळ्या भागात आम्ही चित्रीकरण करत आहोत, अशी माहिती दिली. दरम्यान काही दिवसांपूर्वीच सीमारेषेवर झालेल्या शस्रसंधीच्या उल्लंघनामध्ये शहिद झालेल्या सीमा सुरक्षा दलातील जवानांना राखीने यावेळी श्रद्धांजली वाहिली.
टेलिव्हिजन विश्वामध्ये आजकाल सर्वच कलाकार फार कमी कालावधीतच प्रसिद्धी मिळवतात. त्यातही काही कलाकार भलत्याच कारणांमुळे प्रकाशझोतात येतात. या काही कलाकारांच्या यादीतील एक नाव म्हणजे राखी सावंत. आयटम गर्ल म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत बऱ्याच कारणांनी चर्चेत असते. पण, यापूर्वी राखीच्या नावामुळे तिचा पूर्वाश्रमीचा प्रियकर चर्चेत आला होता. राखी आणि अभिषेक अवस्थी यांच्या नावाच्या बऱ्याच चर्चा काही वर्षांपूर्वी रंगल्या होत्या. पण, त्यांचे हे नाते काही फार काळ टिकू शकले नाही.
आपल्या वाचाळ वक्तव्यांनी नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री आणि आयटम गर्ल राखी सावंत हिचे टेलिव्हिजनवर स्वयंवर होऊन सात वर्षे उलटली आहेत. तरीही, राखी अद्याप योग्य वराच्या शोधात आहे. राखी का स्वयंवर या गाजलेल्या शोमध्ये राखीने अनिवासी भारतीय एलेश परुजनवाला याच्याशी साखरपुडा केल्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र त्यानंतर टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत राखी सावंतने पैशांसाठी एलिशसोबत साखरपुडा केल्याचे म्हटले होते. मला फ्लॅट विकत घ्यायचा होता. मी खोटं का बोलू? नंतर पुढे जाऊन घटस्फोट द्यावा लागेल अशा व्यक्तिशी मी लग्न करणार नाही. सध्या मी कोणालाही डेट करत नाहीये. प्रसारमाध्यमांनी माझी जी प्रतिमा निर्माण केली आहे, त्यामुळे मला चांगले काम मिळत नाहीये. मला एखाद्या तरुण मुलाशी किंवा नाव कमविण्यासाठी झगडत असलेल्या एखाद्या व्यक्तिशी लग्न करण्याची इच्छा नाही. मी एखाद्या प्रौढ आणि संपन्न अशा व्यक्तिच्या शोधात आहे. जो माझी काळजी घेईल आणि माझ्या गरजा पूर्ण करेल. असे राखीने म्हटले होते.