सोशल मीडिया एखाद्या व्यक्तीचे आयुष्य कशाप्रकारे बदलते याचे जिवंत उदाहरण म्हणजे रानू मंडल. रेल्वे प्लॅटफॉर्मवर गाणाऱ्या रानूने आपल्या सुरेल आवाजाने नेटकऱ्यांची मने जिंकली आणि त्यांचा व्हिडीओ अल्पावधीतच तुफान व्हायरल झाला. हा व्हिडीओ पाहून प्रसारमाध्यमांनी त्यांना शोधून त्यांच्या मुलाखतीसुद्धा घेतल्या. इतकच नव्हे तर रानू यांनी संगीतकार व गायक हिमेश रेशमियासाठी एक गाणे रेकॉर्ड केले. रानू या रातोरात स्टार झाल्या. आता रानू मंडल सारख्या अशाच एका व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सध्या सोशल मीडियावर पटणामधील एका गरीब व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पण या व्यक्तीने बॉलिवूडमधील कोणतेही गाणे न गाता हॉलिवूड गायक जिम रीव्स यांचे ‘He’ll Have to Go’ हे इंग्रजी गाणे त्यांच्या मधूर आवाजात गायले आहे. तसेच तो व्यक्ती व्हिडीओ शूट करणाऱ्या सोबत देखील इंग्रजीमध्ये संवाद साधत असल्याचे दिसत आहे.

या व्यक्तीचे नाव सनी बाबा असे असून ते एक डान्सर आणि सिंगर असल्याचे सांगताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. सनी बाबा यांचा मधूर आवाज ऐकून एका व्यक्तीने त्यांचा व्हिडीओ शूट करुन सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी व्हिडीओ शेअर करताच अनेकांनी तो शेअर देखील केला आहे.

आणखी वाचा : रानू मंडलने केला मेकओव्हर, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

सनी बाबा हे उदर्निवाह करण्यासाठी भिक मागत आहेत. तसेच त्यांचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व पाहून अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे.