गेल्या वर्षभरापासून झी मराठी वाहिनीवरील ‘अग्गंबाई सासूबाई’ ही मालिका प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करतेय. या मालिकेच्या कथानकातील नवनवीन ट्विस्ट प्रेक्षकांना त्यात गुंतवून ठेवतायत. आपला मुलगा बबड्या अर्थात सोहमला कायम पाठिशी घालणारी त्याची आई आसावरी आता त्याला चांगलाच धडा शिकवणार आहे. आसावरीच्या भोळ्या व भाबड्या स्वभावाचा बबड्याने नेहमीच फायदा घेतला आहे. मात्र आता मालिकेच्या आगामी भागांत, आसावरी त्याला घरातून हाकलून काढणार आहे. आगामी भागाचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून त्यावरील भन्नाट मीम्ससुद्धा व्हायरल होऊ लागले आहेत.

आसावरीने बबड्याला कानाखाली मारल्यानंतर प्रेक्षकांची काय प्रतिक्रिया असेल, यावरून अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ‘अग्गंबाई सासूबाई’ ही मालिका व त्यातील कलाकार सोशल मीडियावर फार चर्चेत असतात. बबड्या ही भूमिका चांगलीच गाजली असून त्यावर अनेक मीम्स व्हायरल होत असतात.

या मालिकेत निवेदिता सराफ, गिरीश ओक, तेजश्री प्रधान आणि आशुतोष पत्की यांच्या मुख्य भूमिका आहेत.