बॉलिवूडचा सिंघम अर्थात अजय देवगण लवकरच एका मराठी चित्रपटात भूमिका साकारताना दिसणार आहे. अजयने स्वत: ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करत या चित्रपटाविषयी माहिती दिली. सतीश राजवाडे दिग्दर्शित या चित्रपटाचे नाव ‘आपला मानूस’ असे आहे. यामध्ये अजय पाहुण्या कलाकाराच्या भुमिकेत दिसणार आहे.

‘या चित्रपटसृष्टीत मला २५ वर्षे झाली. नवीन चित्रपट, नव्या भूमिका, नवीन कथा यांमुळे तुमच्यासोबत आपुलकीचं नातं निर्माण झालं. त्याचप्रमाणे महाराष्ट्रासोबतचं माझं नातं जन्मापासूनचे आहे. मराठी भाषेसाठी नेहमीच आदर होता, पण काजोलशी लग्न केल्यानंतर मराठी भाषेवर, संस्कृतीवर प्रेम करू लागलो. याच संस्कृतीमुळे मराठी चित्रपटांची एक वेगळीच ओळख आहे. मराठी चित्रपटसृष्टीचा एक भाग होण्यासाठी मी ‘आपला मानूस’ तुमच्या भेटीला आणतोय,’ असे अजयने व्हिडिओमध्ये म्हटले. या चित्रपटात नाना पाटेकर, सुमीत राघवन, इरावती हर्षे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

वाचा : करणच्या यश- रुहीसाठी ही अभिनेत्री झाली सांताक्लॉज

मराठी चित्रपटात भूमिका साकारण्याची अजयची ही पहिलीच वेळ असेल. त्याचप्रमाणे दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी ‘मुंबई-पुणे-मुंबई’, ‘प्रेमाची गोष्ट’, ‘ती सध्या काय करतेय’ असे दमदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणले. त्यामुळे ‘आपला मानूस’ या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा असतील. हा चित्रपट ९ फेब्रुवारी रोजी प्रदर्शत होणार आहे.