अजमेरचे सरवर चिश्ती यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत. कारण त्यांनी आता असं म्हटलं आहे की मुलगी किंवा बाई ही गोष्टच अशी आहे की ज्यामुळे कुणाचाही पाय घसरू शकतो. अगदी विश्वामित्रही त्यासाठी अपवाद नाहीत. आता चिश्ती यांनी हे वक्तव्य केल्याने वाद निर्माण झाला आहे. कारण विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते विनोद बंसल यांनी त्यांना उत्तर दिलं आहे. बंसल यांनी असं म्हटलं आहे की काही लोक उपभोग्य समजतात. त्यांचा हलाला करतात, स्त्रीकडे भोगण्याची वस्तू म्हणून पाहतात त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सरवर चिश्ती यांनी महिलांविषयी नेमकं काय वक्तव्य केलं आहे?

सरवर चिश्तींनी म्हटलं आहे की “माणूस पैशाने भ्रष्ट होत नाही, त्याची मूल्यं भ्रष्ट होऊ शकत नाहीत. मात्र बाई ही अशी गोष्ट आहे ज्यामुळे मोठ्या मोठ्या माणसाचा आणि मनावर संयम आहे असा दावा करणाऱ्या माणसाचा पाय घसरतो. विश्वामित्र ऋषींचा पाय घसरला होता. एवढंच काय जेवढे बाबा लोक तुरुंगात आहेत ते सगळे मुलींच्याच प्रकरणांमध्ये अडकले आहेत. मुलगी किंवा बाई हा असा विषय आहे ज्यामध्ये कुणीही घसरु शकतो.”

निवडणुका जिथे असतात तिथे सिनेमा तयार होतात

याआधी सरवर चिश्ती यांनी म्हटलं होतं की काश्मी फाईल्स असो की केरला स्टोरी आता अजमेर फाईल्स 92 सिनेमा आणला जातो आहे. ज्या ठिकाणी निवडणुका असतात तिथे तशा प्रकारचा सिनेमा आणला जातो. कर्नाटकात भाजपाचा पराभव झाला. आता अजमेर 92 सिनेमा अडीचशे मुलींवर बलात्कार झाल्याचं आणि त्यांना ब्लॅकमेल केल्याचं दाखवण्यात आलं आहे असं मी ऐकलं. मात्र त्यावेळी तक्रार केली होती ती १२ मुलींनीच असंही चिश्ती यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर चिश्ती यांनी हा आरोप केला की हा सिनेमा ख्वाजा गरीब नवाज चिश्ती हा दर्गा आणि एका शिक्षण संस्थेला बदनाम करण्यासाठी आणला जातो आहे. दर्ग्यात असा कुठलाही प्रकार घडला नव्हता. जे प्रकरण त्यावेळी घडलं त्यात अनेक लोक सहभागी होते असंही त्यांनी म्हटलं आहे.

विहिंपचं चिश्तींना उत्तर

या सगळ्या प्रकरणी विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते विनोद बंसल म्हणाले की अजमेर 92 या सिनेमावर अजमेर दर्ग्याचे खादीम सरवर चिश्ती यांच्या वक्तव्याने ते सत्य असल्याची मोहरच लावली आहे. जे स्त्रीला उपभोग्य वस्तू समजतात त्यांच्याकडून हीच अपेक्षा आहे. तीन तलाक, हिजाब आणि काळ्या बुरख्यांमध्ये जे बायकांना ठेवतात त्यांचे विचारही तसेच असणार असंही बंसल यांनी म्हटलं आहे. आम्हाला यांची लाज वाटते की हे स्वतःला भारतीय म्हणवत आहेत. आज तकने या विषयीचं वृत्त दिलं आहे.

अजमेर 92 हा सिनेमा १४ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा सेक्स स्कँडल आणि ब्लॅकमेलिंगवर आधारीत आहे. हा सिनेमा म्हणजे त्या अडीचशे मुलींची कहाणी आहे ज्यांना हे सहन करावं लागलं. ज्यांना जाळ्यात ओढलं गेलं, ज्यांच्यावर बलात्कार झाला आणि मग त्यांना ब्लॅकमेल करण्यात आलं. हा सिनेमा पुष्पेंद्र सिंह यांनी दिग्दर्शित केला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajmer dargah sarwar chishti controversial statement on women scandal and movie ajmer 92 scj