बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणावर अभिनेता अक्षय कुमारने अखेर मौन सोडलं आहे. अक्षयने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांना व माध्यमांना विनंती केली आहे.

काय म्हणाला अक्षय?

“आज मी खूप जड अंत:करणाने बोलतोय. गेल्या काही दिवसांपासून बोलायची इच्छा होती, पण सगळीकडे इतकी नकारात्मकता पसरली आहे की काय बोलू आणि कोणाशी बोलू हे समजत नव्हतं. बॉलिवूडला तुमच्या प्रेमानेच मोठं केलंय. आज तुमचा रागसुद्धा आम्हाला मान्य आहे. सुशांत सिंह राजपूतच्या अकस्मात मृत्यूनंतर असे अनेक मुद्दे समोर आले आहेत, ज्यांनी केवळ तुम्हालाच नाही तर आम्हालासुद्धा धक्का दिला आहे. या मुद्द्यांनी आपल्याला आत्मपरिक्षण करण्यास भाग पाडलं आहे. फिल्म इंडस्ट्रीतील ड्रग्जचा मुद्दा समोर आला आहे. मी माझ्या हृदयावर हात ठेवून हे खोटं कसं बोलू की ड्रग्जची समस्या इंडस्ट्रीत अस्तित्त्वात नाही? इंडस्ट्रीत ड्रग्जची समस्या आहे पण इंडस्ट्रीतल्या प्रत्येकाचा त्यात सहभाग आहे असं होऊ शकत नाही. ड्रग्जचा तपास प्रशासनाकडून अगदी योग्य पद्धतीने होईल आणि इंडस्ट्रीतला प्रत्येक माणूस त्यांना चौकशीत सहकार्य करेल. पण मी हात जोडून विनंती करतो, की संपूर्ण इंडस्ट्रीला एकाच दृष्टिकोनातून पाहू नका. हे चुकीचं आहे. मी माध्यमांनाही विनंती करतो की त्यांनी संवेदनशील राहून योग्य वृत्त द्यावं. कारण एका नकारात्मक बातमीने त्या व्यक्तीची वर्षानुवर्षांची मेहनत पाण्यात वाहून जाईल. मी चाहत्यांनाही विनंती करतो की त्यांचं प्रेम आणि त्यांचा विश्वास आम्ही पुन्हा जिंकून दाखवू. पण आमची साथ सोडू नका”, असं तो म्हणाला.

बॉलिवूडमधील ड्रग्जच्या मुद्द्याचा तपास एनसीबी करत असून त्यांनी या प्रकरणात आतापर्यंत आठ ते नऊ जणांना अटक केली आहे.