Amol Palekar भारतीय चित्रपट सृष्टीत मोलाचं योगदान देणारे आणि ऑफबीट चित्रपटांसाठी ज्यांची ओळख आहे असे अमोल पालेकर यांनी आता मराठी आणि हिंदी वादावर त्यांची स्पष्ट आणि परखड भूमिका मांडली आहे. दैनिक जागरण या हिंदी दैनिकाच्या कार्यक्रमात अमोल पालेकर आणि त्यांच्या पत्नी संध्या हे दोघंही गेले होते. तिथे ‘हिंदी है हम’ असा फलक होता. तो पाहून अमोल पालेकर यांनी मी अस्सल मराठी आहे हे त्या मंचावर आवर्जून सांगितलं. तसंच या फलकामागे राजकारण असेल तर ते मान्य नाही असंही सांगितलं ज्यानंतर दैनिक जागरणने स्पष्टीकरण दिलं. त्रिभाषा सूत्र लागू होईल आणि तिसरी भाषा हिंदी असेल असं सरकारने दोन अध्यादेशांमध्ये सांगितलं होतं. मात्र ५ जुलैला या विरोधात मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या मोर्चाची घोषणा झाली होती. ज्यानंतर दोन्ही अध्यादेश रद्द करण्यात आले. यानंतर ५ जुलैला ठाकरे बंधूंनी एकाच मंचावर येत मराठी बाबतची भूमिका मांडली होती.
काय म्हणाले अमोल पालेकर?
“मला एक गोष्ट सांगायची आहे की हा कार्यक्रम हिंदी ‘दैनिक जागरण’चा आहे त्यामुळे मागे ‘ हिंदी है हम’ हा संदर्भ आहे. मात्र यामागे जर काही राजकारण असेल तर मी त्याच्याशी सहमत नाही. मी मराठी आहे, माझी मातृभाषा मराठी आहे. आम्ही दोघंही अस्सल मराठी आहोत. माझ्या करिअरच्या सुरुवातीला अनेकांनी मला सुचवलं की अमोल पालेकर हे मराठी नाव तुम्ही हटवा. पण मी कुणाचं ऐकलं नाही. माझी आत्मकथाही मी आधी मराठीत लिहिली. त्यानंतर त्याचा अनुवाद इंग्रजी आणि हिंदीत केला. हिंदी ही एक सुंदर भाषा आहे. प्रत्येक भाषा जशी सुंदर असते तशीच हिंदी आहे. ४ जुलैला हा व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट कऱण्यात आला. मात्र या कार्यक्रमात अमोल पालेकर यांनी अस्सल मराठी असल्याचं ठणकावून सांगितलं. त्या कार्यक्रमाचाा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
महाराष्ट्रात भाषेचा वाद उफाळून यावा म्हणून प्रयत्न होत आहेत-अमोल पालेकर
महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा प्रयत्न होतो आहे. भाषेचा वाद उफाळून यावा यासाठी हे केलं जातं आहे. मी आणि संध्या (अमोल पालेकर यांची पत्नी) याचा विरोध करतो. आपण गर्वाने म्हणतो की आपण भारतीय आहोत. या भारतात प्रत्येक नागरिकाच्या भाषेचा सन्मान केला जातो. सर्वसमावेशक भूमिकेचा आम्ही आदर करतो. असं अमोल पालेकर यांनी म्हटलं होतं. यानंतर दैनिक जागरण तर्फे स्पष्टीकरण देण्यात आलं.
दैनिक जागरणतर्फे लगेच देण्यात आलं स्पष्टीकरण
अमोल पालेकर सरांनी चांगला प्रश्न उपस्थित केला. ‘हिंदी है हम’ मागे कुठलंही राजकारण नाही. हिंदी है हम हे आमचं एक माध्यम आहे. पण कुठल्याही भाषेला कमी लेखून आम्हाला पुढे जायचं नाही. भारतातली प्रत्येक भाषा ही राष्ट्रभाषा आहे असं आम्ही मानतो. ज्यांना बोली म्हणून मान्यता मिळाली त्या भाषाही राष्ट्रभाषा आहेत असं आम्ही तुम्हाला सांगतो आहे. असं या कार्यक्रमाच्या आयोजकांनी सांगितलं.