भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने गेल्याच आठवड्यात त्याची प्रेयसी आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माच्या वडिलांची भेट घेतली होती. या भेटीनंतर अनुष्का-विराटने विवाह करण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा रंगली पण या चर्चेला अनुष्काने पूर्णविराम दिला आहे. येत्या डिसेंबरमध्ये दोघेही विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चेला उधाण आले होते पण या सर्व शक्यता अनुष्काने फेटाळून लावल्या आहेत. अनुष्का शर्माच्या लग्नासंबंधीच्या गोष्टींमध्ये काहीही तथ्य नाही. ती सध्या आपल्या कामात व्यस्त असून ती आपल्या कामात खूष आहे, असे निवेदन अनुष्काच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आले आहे. अनुष्का आपल्या वैयक्तीक आयुष्यात नेहमी मोकळी आणि स्पष्ट राहिली आहे. त्यामुळे केवळ अंदाज बांधत बसण्यापेक्षा अधिकृत घोषणेची वाट पाहावी, असे आवाहन अनुष्काने केल्याचेही निवदेनात नमूद करण्यात आले आहे.
अनुष्का आणि विराट यांचे नाते काही लपून राहिलेले नाही. गेल्या वर्षभरापासून दोघेही विविध कार्यक्रमात एकत्र दिसून आले आहेत. तर, विराटनेही अनेकदा अनुष्कासोबतच्या जवळीकतेबाबतची कबुली दिली आहे. नुकतेच या दोघांनी मुंबईत एक घर खरेदी केल्याचीही माहिती समोर आली होती. लग्नानंतर दोघेही या घरात वास्तव्याला येणार असल्याची चर्चा रंगली होती.